चार दिवसांच्या पावसानंतरही पाणीसाठय़ात ५ टक्क्यांचीच वाढ

ठाणे : गेल्या चार दिवसांपासून अविरत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबई, ठाण्यासह आसपासची शहरे जलमय झालेली दिसत असली तरी, या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्राला मात्र, आणखी पावसाची ओढ लागली आहे. गेल्या चार दिवसांत धरणक्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांतील जलसाठय़ात जेमतेम दोन ते पाच टक्क्यांचीच वाढ झाली आहे. बारवी धरणात सद्य:स्थिती १८.५९ टक्के, आंध्रामध्ये २२.५६ टक्के आणि भातसा धरणात २५.०४ टक्के इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण पाहता अजूनही पाणी कपात दूर करण्याजोगी परिस्थिती नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पावसाने जूनचे तीन आठवडे हजेरी न लावल्याने धरणांतील पाणीसाठा चांगलाच रोडावला आहे. ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी, आंध्रा आणि भातसा धरण प्रकल्पांमध्ये पाण्याची तूट निर्माण झाली होती. शुक्रवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या सर्वच शहरांतील रस्ते जलमय झाल्याचे चित्र आहे. मात्र, ठाणे जिल्ह्य़ातील धरणक्षेत्रात अजूनही पुरेसा पाऊस झाला नसल्याचे जलसंपदा विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.

ठाणे जिल्ह्य़ाला बारवी, भातसा आणि आंध्रा या तीन धरण प्रकल्पांमधून पाणीपुरवठा होतो. बारवी धरण क्षेत्र असणाऱ्या मुरबाड भागात सोमवारी ५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. भातसा धरण क्षेत्र असणाऱ्या शहापूर भागात १०१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्य़ातील आंध्रा धरण प्रकल्प क्षेत्रात ५३ मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. सद्य:स्थितीत बारवी धरणक्षेत्रात ४३.३३ दलघमी, आंध्रा प्रकल्पात ७६.५१ दलघमी आणि भातसा प्रकल्पात २३५.९० दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध अल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पाणीपुरवठय़ाचे चित्र

स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, केडीएमसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्था आंध्रा आणि बारवी धरणांतून पाण्याचा उपसा करतात. या प्राधिकरणांद्वारे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली या भागांना पाणीपुरवठा होतो. ठाणे जिल्ह्य़ास पाणीपुरवठा करणाऱ्या प्राधिकरणांना ४० दशलक्ष घनमीटर इतका पाणीपुरवठा होतो. तर भातसा धरणावरील नदी पात्रातून ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी पाणी उचलते.

ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण प्रकल्प क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसला तरी पुढील काळात अधिक पाऊस झाला तर पाणीसाठा वाढेल. मात्र, सध्या लागू असणारी प्रति आठवडा ३० तासांची पाणीकपात ही यापुढेही कायम राहणार आहे.

– सुषमा वाठोरे, उपकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग ठाणे

 

पाणीसाठा टक्केवारी

धरण              २७ जून   १ जुलै

बारवी              १३.८७    १८.५९

आंध्रा                २०.४०   २२.५६

भातसा             २२.१२    २५.०४