उल्हास नदीतील जलपर्णीकडून पाण्याचे भरमसाट शोषण;
मोहने परिसरामध्ये जलपर्णीच्या थरामुळे जलस्रोतांचा विनाश
ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी कमालीची घटली असून त्यामुळे आठवडय़ाला ६० तासांच्या पाणीकपातीचे संकट शहरवासीयांवर कोसळले आहे. त्याचबरोबर या नदीपात्रातील पाण्याची गुणवत्ताही घसरून पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्यावर जलपर्णीने आपले जाळे टाकले असून ही वनस्पती पाणी शोषून घेत आहे. मात्र याकडे ठाण्यातील विविध शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रधिकरणांनी मात्र त्याकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर शहरवासीयांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर या भागांना पाणीपुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम आणि कल्याण-डोंबिवली महापालिका उल्हास नदीतून पाणी उचलतात. लाखो लिटर पाण्याचा उपसा या नदीतून होत असताना त्याच्या स्वच्छतेसाठी किंवा परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी या प्राधिकरणांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. परिसरातील कारखान्यांमधून नदीत सांडपाणी सोडले जाण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच या नदीच्या पाण्यावर जलपर्णीचे दाट थर जमा झाले आहेत. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्यासोबतच त्याची पातळीही खालावत चालल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हेच प्रदूषित पाणी आसपासच्या शहरांतील नागरिकांना पुरवले जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर कल्याण पूर्वेकडील काही नागरिकांनी अलीकडेच या परिसराची पाहणी केली असता, ही बाब उघड झाली. त्यानंतर त्यांनी या भागातील प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करून नदीच्या स्वच्छतेची मागणी केली आहे.
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांना या विषयी विचारले असता ‘जलपर्णी साफ करणे महापालिकेच्या आवाक्यातील गोष्ट नाही. हा परिसर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येत असून तेथील स्वच्छता राखण्यासाठी त्यांना पत्र पाठवण्यात आले आहे,’ असे उत्तर त्यांनी दिले.

प्रदूषित पाण्यातच जलपर्णी वाढत असते. त्यामुळे उल्हास नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी हा प्रदूषित पाण्याचा ढळढळीत पुरावा आहे. जलपर्णीमुळे पाण्याची पातळी खालावते. जलपर्णी फार काळ नदीपात्रात राहिली तर पाणी दूषित होते. ते मानवी आरोग्यास घातक असते.
– प्रा. मनीषा कर्पे, जलअभ्यासक

उल्हास नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीतील पाणी मोठय़ा प्रमाणात शोषले जात असून त्यामुळे पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे पाण्याशिवाय राहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. दुसरीकडे येथील अस्वच्छतेमुळे पाणी पिण्यायोग्यही राहिले नाही. या दुहेरी संकटात जिल्ह्य़ातील नागरिक आहे. त्यामुळे हा भाग स्वच्छ करायला हवा अन्यथा या ठिकाणी आंदोलन केले जाईल.
– नितीन निकम, माजी नगरसेवक