गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस

ठाणे : जिल्ह्यातील धरण क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे जुलै महिना संपत आला तरी ५० टक्के रिकामीच असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा ५० टक्के पाऊस कमी झाला असून ही प्रमुख धरणे भरण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागणार आहे.

गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे जुलै महिन्याच्या अखेरीस ८० टक्क्यांहून अधिक भरली होती.  यंदा जुलै महिना संपत आला असला तरी जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे निम्मी रिकामीच असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात भातसा धरण क्षेत्रात १ हजार ९९९ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे या धरणात ७७२.९०६ दलघमी इतका पाणीसाठा जमा झाला होता. यंदा मात्र या धरण क्षेत्रात केवळ १ हजार ७२ मिमी पाऊस झाल्याने धरणात केवळ ४८४.२५६ दलघमी इतका पाणासाठा जमा झाला आहे. तानसा धरणात गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात १ हजार ८०८ मिमी पाऊस झाल्याने १०० टक्के भरले होते. यंदा पाऊसाने पाठ फिरवल्यामुळे या धरण क्षेत्रात दोन महिन्यांपासून केवळ ७३४ मिमी पाऊस झाल्यामुळे धरणात केवळ ३६.४७३ दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे. तर, गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात मोडकसागर धरणक्षेत्रात २ हजार ३३ मिमी पाऊस झाल्याने हे धरण १०० टक्के भरले होते. मात्र, यंदा  या धरणात केवळ ४९.२७३ दलघमी इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तर, मध्य वैतरणा धरणात गेल्या वर्षी जुलै अखेपर्यंत  १८१.९८४ दलघमी इतका पाणीसाठा होता. यंदा, या धरण क्षेत्रात केवळ ९७६ मिमी पाऊस झाल्याने या धरणात केवळ ६३.२१० दलघमी पाणीसाठा जमा झाला आहे.  गेल्या वर्षी जुलै महिना अखेपर्यंत बारवी  धरणात २१७ दलघमी पाणीसाठा होता. मात्र, गेल्या दोन महिन्यात या धरणक्षेत्रात केवळ ८७४ दलघमी इतका पाऊस झाल्यामुळे या धरणात १६०.२९० दलघमी पाणी जमा झाले आहे. त्यामुळे ही सर्व धरणे भरण्यासाठी ऑगस्ट महिन्यात पावसाची वाट पाहावी लागणार आहे.

जुलैअखेरपर्यंतचा पाणीसाठा (पाणीसाठय़ाची टक्केवारी)

धरणाचे नाव         गेल्या वर्षीचा  पाणीसाठा   सध्याचा पाणीसाठा

भातसा                     ८२.०४                           ५१.४०

तानसा                       ९९.९१                           २५.१४

मोडकसागर                 १००                             ३८.२८

म.वैतरणा                   ९४.०३                           ३२.६६

बारवी                          ९३.११                           ४७.३१