पत्र देऊनही उपाय न केल्याचा रेल्वेचा आक्षेप;महापालिका प्रशासनाने आरोप फेटाळले

किशोर कोकणे, ठाणे</strong>

गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसात ठाणे रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचण्याला ठाणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. पालिकेच्या हद्दीतील परिसरात साचणारे पाणी रेल्वे रुळांलगतच्या गटारात सोडण्यात येत असल्याने ही गटारे ओसंडून त्यातील पाणी रुळांवर जमा झाल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. यासंदर्भात पालिकेला जूनमध्ये पत्र देऊनही उपाययोजना न राबवल्याचा दावाही रेल्वेने केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने हा आरोप फेटाळत रेल्वे स्थानकात पाणी साचण्याची जबाबदारी पालिकेची नसल्याचे स्पष्ट केले आहे.

शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि आठजवळ महापालिकेने वाहिन्या सोडल्या आहेत. बी-केबिन, स्थानक परिसर, कोपरीतील चिंधी नाला परिसरात साचलेले पाणी थेट रेल्वे रुळांजवळील गटारात सोडण्यात येते. पाऊस वाढताच ही गटारे तुडुंब भरून जातात. त्यामुळे या गटारातील पाणी थेट रेल्वे रुळांवर येते. त्यामुळे दर वर्षी लोकल खोळंबा होतो. या वर्षी असला प्रकार घडू नये यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मध्य रेल्वेने ठाणे महापालिकेला पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर महापालिकेचे कर्मचारी स्थानकात येऊन पाहणी करून गेले. तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

महापालिकेने व्यवस्थित कामे केली नसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचा दावा रेल्वेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा एकदा रेल्वे रुळांवर पाणी साचून लोकल गाडय़ांना विलंब होण्याची शक्यता रेल्वेचे अधिकारी व्यक्त करत आहेत. यासाठी येत्या दोन दिवसांत रेल्वेचे अधिकारी पुन्हा एकदा महापालिकेला पत्रव्यवहार करून कामाची आठवण करणार असल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

महापालिकेने मात्र, रेल्वेचा आक्षेप खोडून काढला आहे. ‘रुळांवर साचणाऱ्या पाण्याची जबाबदारी महापालिकेची नाही. रेल्वेने आम्हाला यासंदर्भात पत्र दिले असले तरी, आम्हीही तेव्हाच ही गोष्ट रेल्वेला कळवली आहे,’ असे महापालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी म्हटले.  रेल्वे मार्गावरील गटारांची सफाई व्यवस्थित राखल्यास हा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले.

‘पत्र का स्वीकारले?’

यासंबंधी रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता महापालिकेची जबाबदारी नाही तर त्यांनी आम्ही पत्रव्यवहार केला त्या वेळी पत्र का स्वीकारले, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच त्यांची कंत्राटदारही येथे पाहणी करून गेल्याचा दावा त्या अधिकाऱ्याने केला. महापालिकेच्या हद्दीतून हे पाणी येत आहे. त्यामुळे निचरा करणे हे महापालिकेचे काम आहे. महापालिकेने जर याकडे लक्ष दिले नाही, तर स्थानकात मोठे पाणी साचून त्याचा त्रास प्रवाशांना होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पाणी साचते तेव्हा..

लोकल गाडय़ांना रूळ बदलण्यासाठी रेल्वे रुळांजवळ काही पॉइंट मोटार बसविण्यात येतात. या पॉइंट मोटारच्या आधारे लोकल गाडय़ा रेल्वे रूळ बदलत असतात. मात्र, पाणी साचल्यावर या मोटार काम करणे बंद करतात. अशा ४० हून अधिक मोटार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आहेत. त्यामुळे रुळांवर पाणी साचल्यास रेल्वे सेवा विस्कळीत होते.