ठाणे : माजिवाडा परिसरात बुधवारी सकाळी मेट्रो प्रकल्पासाठी यंत्राद्वारे खोदकाम सुरू असताना या यंत्राचा धक्का लागून महापालिकेची जलवाहिनी फुटल्याने त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे या वाहिनीवरून होणाऱ्या परिसरांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

सायंकाळपर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून या भागांचा पाणीपुरवठा पूवर्वत करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. असे असले तरी दुरुस्तीनंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

जलवाहिनी फुटल्यानंतर अर्धा ते पाऊण तास वाहिनीतून पाणी वाया जात होते. त्यामुळे या परिसरात सर्वत्र पाणी साचले. हे पाणी सेवा रस्त्यांलगत असलेल्या काही घरांमध्ये गेल्याचे दिसून आले. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे उपवन, पोखरण दोन, वसंत विहार, सिद्धांचल, गावंड भाग, शिवाईनगर, गांधीनगर या भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.