चांगले रस्ते हवेत तर पाणी मिळणार नाही, असा काहीसा अजब न्याय सध्या बदलापूरकरांच्या नशिबी आला आहे. बदलापूर पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना मंगळवारी सकाळी जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे आगामी काही दिवस तरी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होईल वा काही ठिकाणी पाणीकपात करावी लागण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूसाठीच्या वाहिन्या आणि रिलायन्स कंपनीच्या वाहिन्या भूमिगत करण्यात येत आहेत. कंपन्यांनी नेमलेले कंत्राटदार रात्रीच्या सुमारास रस्ता खोदण्याच्या कामास सुरुवात करतात. त्यामुळे अंधारात जलवाहिन्यांची जागा न कळल्याने ती कापली तरी जाते किंवा तिला धक्का बसतो आणि मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता डी. एन. बागुल यांनी अशा स्वरूपाच्या तक्रारी कार्यालयात दाखल झाल्याचे ‘लोकसत्ता ठाणे’ला सांगितले. मंगळवारीही तसेच झाले. पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने १२ फुटांपर्यंत त्याचे कारंज्यात रूपांतर झाले. यामुळे पाणीपुरवठय़ावर काही परिणाम होईल का, यासंबंधीची अधिकृत घोषणा अद्याप नगरपालिकेने केलेली नाही. दुपापर्यंत जलवाहिनी पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणांचा परिणाम?
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँकरणाच्या कामामुळे शहरात मोठय़ा प्रमाणावर वादंग उभे राहू लागले आहेत. जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार या कामांमुळे वाढीस लागल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून सातत्याने केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्यांनाही या कामामुळे धक्का बसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या कामावर योग्य नियंत्रण राखले गेले पाहिले, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.