टंचाईच्या काळात हजारो लिटर पाणी वाया
पाणी टंचाईचे गहिरे होत असताना जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. हे प्रकार वाढीस लागल्याने महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आले असून, हजारो लिटर पाणी वाया जात आहे. मंगळवारी रात्री खंबाळपाडा येथील जलवाहिनीचा वॉल तुटल्याने या परिसरातील पाण्याचा पुरवठा खंडित झाला. बुधवारी सायंकाळी ठाकुर्ली येथील जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
धरणांमध्ये पाणी साठा कमी असल्याने महापालिका प्रशासन त्यावर विविध उपाययोजना करत आहे. शहरात तीन दिवस पाणी कपात लागू करण्यात आली असल्याने अनेक भागात पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाच वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्यांमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी होऊ लागली असून वारंवार घडणारे हे प्रकार रोखायचे तरी कसे, असा प्रश्न महापालिकेतील अभियंत्यांना सतावू लागला आहे. बुधवारी सायंकाळी कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यालगत ठाकुर्ली चोळेगाव येथे महापालिकेची मुख्य जलवाहिनी फुटली.

ठेकेदारांकडूनच पाणी चोरी
पंचायत बावडी येथील रस्त्यांचे सीमेंट क्रॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असून रस्त्यांचे ठेकेदार मुख्य जलवाहिन्यांना छिद्र पाडून तेथून पाणी चोरी करत आहेत, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.