पाणीग़ळतीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

डोंबिवली शहराच्या विविध भागात महापालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवरून घेण्यात आलेल्या बेकायदा जोडण्यांना अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पालिकेच्या जल विभागातील कर्मचारीही जोपर्यंत अशा ठिकाणच्या तक्रारी येत नाहीत तोपर्यंत या पाणी गळतीकडे दुर्लक्ष करीत आहेत.

कल्याण-डोंबिवली शहरात बेकायदा बांधकामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांना महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नाही. या बेकायदा वस्त्यांमध्ये राहणारे रहिवासी रात्रीच्या वेळेत चोरटी कामे करणाऱ्या प्लम्बरना हाताशी धरून पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला वेल्डिंग यंत्राच्या साहाय्याने छिद्र पाडतात. चोरून बेकायदा चाळीपर्यंत जलवाहिन्या घेतात. या जलवाहिन्यांना मध्यभागी बुस्टर बसविले जाते आणि अधिक दाबाने पाणी खेचले जाते. अनेक ठिकाणी या चोरीच्या जलवाहिन्या रस्ते, पदपथ, नाल्यांच्या मध्यभागातून टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे येजा करणारी वाहने, पादचाऱ्यांसाठी या जलवाहिन्या अडथळा ठरत आहेत. रहिवाशांना जलवाहिनी फुटल्याची माहिती नसते.जलवाहिनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा रिक्षाचालक रिक्षा धुण्यासाठी, टपरी मालक, झोपडीधारक वापर करीत आहेत. पालिका अधिकारी फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यासाठी आले तरी दुसरी जलवाहिनी तोडून निघून जातात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

पाणी गळतीची ठिकाणे

  • डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा रस्त्यावरील बंदिश हॉटेल भागात रस्त्याखालून गेलेली जलवाहिनी सतत फुटत असल्याने या भागात तळे साचलेले असते. या रस्त्यावरून दिवस, रात्र वाहनांची येजा सुरू असते. त्यामुळे साचलेल्या पाणी, खड्डय़ातून मार्ग शोधत वाहनचालकांना जावे लागते.
  • डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा भागातील गोपीनाथ चौकात सुमारे ५० ते ६० जलवाहिन्या पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा घेण्यात आल्या आहेत. या जलवाहिन्या यापूर्वी नाल्यातून चोरून घेण्यात येत होत्या. आता उघडपणे रहिवासी मुख्य जलवाहिनीवरून पाणी वापरत आहेत.
  • या जलवाहिन्यांवरून सतत वाहनांची येजा सुरू असल्याने त्या फुटतात आणि पाणी गळती सुरू होते. मागील आठवडय़ापासून गोपीनाथ चौकातील जलवाहिन्या फुटल्याने चौकात पाणी साचले होते.
  • पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता, कर्मचाऱ्यांना या चोरीच्या जलवाहिन्यांची माहिती असूनही त्यांच्याकडून या वाहिन्यांवर कारवाई केली जात नसल्याच्या या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. या चोरीच्या वाहिन्यांमुळे आजूबाजूच्या गृहसंकुलांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या संकुलांना पालिकेच्या पाणीपुरवठा टँकरवर अवलंबून राहावे लागते.
  • डोंबिवली एमआयडीसीतील फेज दोनमधील शिळफाटा रस्त्यावरील पिंपळेश्वर हॉटेलसमोर एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून मागील तीन दिवसांपासून पाणी गळती होत आहे. रहिवाशांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.