वसंतनगरीतील सांडपाणी वाहिनीला संरक्षक भिंत नसल्याने प्रवाहाचा मारा

वसई पूर्वेतील भागात असलेल्या वसंतनगरी परिसरातील नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत नसल्याने येथील इमारतींचा पाया खचला. तर काही इमारतींना तडे गेल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वसईच्या पूर्वेकडील वसंतनगरी परिसरात सेक्टर-२च्या मागील बाजूस नाला आहे. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे इमारतीकडील काही भाग कोसळू लागला आहे. त्यामुळे इमारतींचा पाया खचू लागला आहे. काही भागांना तडे जाऊ लागले आहेत.

मध्यंतरी इमारतीजवळच्या नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत तयार करून नाला बंदिस्त करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.

पावसाळ्यापूर्वी या नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधणे व नालाबंदिस्त करणे गरजेचे होते, परंतु पालिका प्रशासनाकडून फक्त अश्वासने दिली जात असून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राज दसोनी यांनी केला आहे. या नाल्याच्या ठिकाणी नुकतीच पालिकेच्या वतीने नालेसफाई करण्यात आली, मात्र त्यामुळे कडेचा असलेला बराच भाग हळूहळू खचू लागला आहे. तसेच नाल्यातून घाणीच्या पाण्याचा निचरा होत असतो, पंरतु हा नाला बंदिस्त नसल्याने या नाल्यातून मोठय़ा प्रमाणात दरुगधीही आजूबाजूच्या परिसरात पसरत असते. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला असल्याचे दसोनी यांनी सांगितले आहे.  या ठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये दोन हजाराहून अधिक कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. या नाल्याशेजारीच ही सोसायटी असल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उघडय़ा नाल्यामुळे परिसरात दरुगधीबरोबरच डासांचे प्रमाण देखील वाढू लागले आहे. यामुळे विविध प्रकारचे आजारही या परिसरात झपाटय़ाने वाढू लागले आहेत.

पुरस्थितीची भीती

पावसाळ्यात या नाल्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहत असते. त्यामुळे हे पाणी ओव्हरफ्लो होऊन या परिसरात असलेल्या इमारतीमध्ये घुसण्याची शक्यता आहे. मागील वर्षी निर्माण झालेल्या पूरस्थितीचा देखील मोठा फटका येथील नागरिकांना बसला होता. यासाठी या भागात संरक्षणभिंत तयार करून उघडा असलेला नाला बंदिस्त करण्यात यावा, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. परंतु त्यावर अजून उपाययोजना न झाल्यामुळे येथील परिसर पुन्हा पाण्याखाली जाऊन पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.