|| कीर्ती केसरकर

वसई-विरार महापालिका म्हणते, मनुष्यबळ नसल्याने पथक स्थापन नाही

उन्हाळयात रस्त्यावरील शीतपेयांची तपासणी करण्याची महापालिकेची घोषणा हवेत विरली आहे. मनुष्यबळ नसल्याने यासाठी पथक स्थापन झालेले नाही, असे महापालिका प्रशासनाने सांगितले, तर आरोग्य विभागानेही तक्रारी आल्या तरच कारवाई करू, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत पालिका गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

उन्हाळा आल्यावर शीतपेयांची मागणी वाढते. त्यामुळे रस्त्यावर विविध प्रकारची शीतपेये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. मात्र ही शीतपेये आरोग्यासाठी अपायकारक असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी वापरण्यात येणारा बर्फ, पाणी दूषित असते. रंग आणि इतर खाद्यपदार्थांची सामग्रीही अशुद्ध आणि भेसळयुक्त असते. कुर्ला रेल्वे स्थानकात दूषित शीतपेय बनवले जात असल्याची चित्रफीत काही दिवसांपूर्वी प्रसारित झाल्यानंतर शीतपेयांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या घटनेनंतर वसई-विरार महापालिकेने सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करणार असल्याचे जाहीर करत तपासणी पथक स्थापन करत असल्याची घोषणा केली होती.

मात्र अद्याप हे पथक स्थापन झालेले नाही. मनुष्यबळ नसल्याचे कारण देऊन पथक नेमण्याचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्याने पथक नेमण्याचे आणि तपासणीचे काम निवडणुकीनंतर किंवा मे महिन्यात करण्यात येणार आहे, असे पालिका आयुक्त बी. जी. पवार यांनी सागितले.

‘तक्रारी आल्यावर कारवाई करू’

शीतपेय विक्रेत्यांची तपासणी मनुष्यबळाअभावी केली जाणार नाही, तर दुसरीकडे आरोग्य विभागानेही आपले हात वर केले आहे. आमच्याकडे साहाय्यक आयुक्तांकडून तक्रारी आल्या तरच कारवाई करू, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर पालिकेला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी आयुक्तांसोबत जी बैठक झाली, त्यात आम्हाला पथक नेमण्याबाबत काही सांगण्यात आले नाही. प्रत्येक प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त याकडे लक्ष देतील. नागरिकांकडून तक्रार आली तरच कारवाई केली जाईल.   – डॉ. अनिरुद्ध लेले, आरोग्य विभाग अधिकारी

सध्या निवडणुकीच्या कामात कर्मचारी व्यग्र आहेत. माझा याबाबत संपूर्ण अभ्यास झालेला आहे. कागदावरचे कामदेखील पूर्ण झालेले आहे. एकदा का निवडणुका झाल्या मनुष्यबळ उपलब्ध झाले की आम्ही काम पूर्ण करू.    – बी. जी. पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका