निर्णयाची अंमलबजावणी एप्रिल २०१५ पासून
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका सरल्या की मगच शहरवासीयांच्या पाणीबिलात वाढ करण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांवर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने पाणी ओतले असून, पाणी बिलात २० ते ३० टक्के वाढ करण्याच्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पूर्वलक्ष्यी प्रभावाने एप्रिल २०१५ पासून ही दरवाढ लागू होणार असल्याने नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे.
गेल्या फेब्रुवारीत झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी दरवाढीचा ठराव स्थगित ठेवला होता. निवडणुका संपताच त्यास जून महिन्याच्या मध्यावर मंजुरी देण्यात आली खरी, मात्र कल्याणमधील निवडणुका आटोपल्यावर ही दरवाढ प्रत्यक्ष लागू करावी, असा आग्रह सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी धरला होता. असे असताना प्रशासनाच्या दबावापुढे पदाधिकाऱ्यांनी यासंबंधीचा अंतिम ठराव आयुक्तांच्या अंमलबजावणीसाठी पाठविल्याने एप्रिल महिन्यापासूनच ही दरवाढ अमलात आणली जाणार आहे.
ठाणे महापालिकेत आयुक्तपदी रुजू होताच संजीव जयस्वाल यांनी आपल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पाणी; तसेच मालमत्ता करातील दरवाढीचा सविस्तर प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मांडला. याच काळात नवी मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते. नवी मुंबईतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी पुढील १५ वर्षे शहरातील कोणताही कर वाढविणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यामुळे करवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिल्यास त्याचा निवडणुकीत फटका बसेल, अशी भीती शिवसेना नेत्यांना होती. त्यामुळे जयस्वाल यांचा प्रस्ताव सलग पाच महिने स्थगित ठेवत नवी मुंबईतील निवडणुकीनंतर तो सभा पटलावर आणण्यात आला. जून महिन्याच्या अखेरीस घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या विरोधाला न जुमानता प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानुसार ही दरवाढ तत्काळ लागू करणे अपेक्षित होते. मात्र, याच काळात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कल्याणातील रणधुमाळीनंतरच दरवाढीचा अंतिम ठराव अंमलबजावणीसाठी पाठवावा, असा आग्रह सत्ताधारी शिवसेनेतील काही नेत्यांनी धरला होता. महापालिका प्रशासनाकडून येणारा वाढता दबाव लक्षात घेता महापौरांनी यासंबंधीचा ठराव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आयुक्तांकडे धाडल्याने ठाणेकरांवरील पाणी दरवाढीची अंमलबजावणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे.
दरवाढ अशी
यापूर्वी ठाणेकरांना ठोक पद्धतीने सहा महिन्याला वा वर्षांला ठरावीक दराने पाणी बिलांची आकारणी केली जात असे. नव्या ठरावानुसार यापुढे घराच्या आकाराप्रमाणे पाण्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. २५० ते ५०० चौरस फूट आकाराच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना महिन्याला २१० रुपये, तर ५०० ते ७५० चौरस फुटासाठी २३० रुपयांची आकारणी केली जाणार आहे. ७५० ते १००० (२६० रुपये), तर त्यापेक्षा अधिक आकाराच्या घरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ३०० रुपयांपेक्षा अधिक बिले येतील. हा ठराव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस प्राप्त झाला असला, तरी रहिवाशांना एप्रिल महिन्यापासूनच दरवाढ आकारली जाईल, असे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. दरम्यान, कल्याणमधील निवडणुकांचा आणि दरवाढ रोखून धरण्याचा काहीएक संबंध नव्हता, असे शिवसेनेच्या महापालिकेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले. तसे असते तर ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर हा ठराव पाठविण्यात आला नसता. काही नेते यासाठी आग्रही होते हे मात्र खरे आहे, असेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.