शहरातील नळजोडण्यांची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय

वसई : वसई-विरारमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. त्यामुळे पालिकेने नळजोडणी देण्याची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच मागणीपेक्षा ९६ दशलक्ष लिटर पाण्याची तूट, त्यात गळती यामुळे शहराला कमी पाणी मिळत आहे. त्यात पालिकेने नवीन नळजोडण्या थांबविल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत.

२०१७ मध्ये वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील १०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पालिकेने मागेल त्याला नळ जोडणी देण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पालिकेने सुमारे १५ हजार नळजोडण्या दिल्या होत्या. तर आतापर्यंत पालिकेने ५२ हजार ४५ नळजोडण्या दिलेल्या आहेत. नळ जोडण्यांसाठी पालिकेकडे शहराच्या विविध भागांतून नागरिकांचे अर्ज येत आहेत. सध्या पालिकेकडे २ हजार ३०८ अर्ज प्रलंबित आहेत. मात्र पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पालिकेने नळजोडणी प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांनी सर्व प्रभागातील साहाय्यक आयुक्तांना नवीन नळ जोडणी न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांचे या उन्हाळ्यात मोठे हाल होणार आहेत.

पुढील तीन महिन्यांत पाण्याचे नियोजन करता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या शहराला २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यापैकी सूर्या पाणी प्रकल्पाच्या दोन्ही टप्प्यांतून १०० दशलक्ष लिटर, पेल्हारमधून १० आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु सध्याच्या शहरातील २४ लाख लोकसंख्येची मागणी ही ३२६ दशलक्ष लिटर आहे. म्हणजे ९६ दशलक्ष लिटर पाणी आधीच कमी मिळत आहे. त्यात पाण्याच्या गळतीचे प्रमाण २१ टक्के आहे. म्हणजे वसईकरांना ३२६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ १८० दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे.

सध्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात ६८ टक्के, पेल्हार धरणात ५० आणि उसगाव धरणात ५८ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. मात्र, सध्याच्या २५ लाख लोकसंख्येची मागणी ३२६ दलशक्ष लिटर असल्याने हे पाणी पुरण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याचे नियोजन करताना नळ जोडण्या न देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुबलक पाणी असल्याचा दावा यामुळे फोल ठरल्याचा आरोप भाजपचे नेते मनोज पाटील यांनी केला आहे. पाणी गळतीचे प्रमाण ३५ टक्के एवढे असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे येत्या तीन महिन्यांत वसईकरावर भीषण पाणीटंचाईचे सावट आहे.