दोन महिन्यांपासून राज्यात व उपनगरात दडी मारल्याने पावसाने गेल्या आठवडय़ात चांगला जोर धरल्याने पाणीटंचाईचे संकट दूर होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. गेल्या आठवडय़ातील दमदार पावसाने अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण पूर्णपणे भरले आहे. उल्हास नदीवरील बॅरेज प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्यामुळे अंबरनाथसह बदलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असे चित्र दिसू लागले आहे.

यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून अंबरनाथ तालुक्यात २० सप्टेंबपर्यंत १६५४ मिमी एवढय़ा पावसाची नोंद झाली आहे. सध्या अंबरनाथ शहर झपाटय़ाने विकसित होत असून शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पाणी वापरात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. अंबरनाथ पश्चिम भागाला पाणी कमी मिळाल्याने येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोर्चेदेखील काढले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पातळीमध्ये चांगली वाढ झाल्याने या शहरांवरील पाणी टंचाईचे संकट दूर झाले आहे. अंबरनाथ पूर्वेला चिखलोली धरणातून तर पश्चिमेला बदलापूरच्या बॅरेज धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सुरुवातीला पुरेशा प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे या धरणांनी तळ गाठला होता. गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने मात्र दोन्ही धरणे भरली असून चिखलोली धरण पूर्ण भरले आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, बॅरेज धरण न भरल्यास सध्या चालू असलेली आठवडय़ातून एक दिवसाची पाणीकपात चालूच ठेवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बॅरेज प्रकल्पातही समाधानकारक पाऊस होतो आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.