• पाण्याचे देयक २० ते २५ टक्क्यांनी वाढणार
  • पाणीपुरवठय़ात झालेल्या वाढीचा परिणाम

नागरिकांना देण्यात येत असलेल्या पाण्याच्या दरात वाढ करण्यावर अद्याप शिक्कामोर्तब व्हायच्या आधीच रहिवासी सोसायटय़ांना देण्यात आलेल्या पाण्याच्या देयकात तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मीरा-भाईंदरची नवी पाणी योजना कार्यान्वित झाल्याने नागरिकांना सध्या दररोज पाणी मिळू लागले आहे. पाणीपुरवठय़ात झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून नागरिकांना ही वाढीव देयके पाठवण्यात आली आहेत. महासभेने पाणीपुरवठय़ाच्या दरवाढीला मान्यता दिली तर या देयकात आणखी वाढ होणार आहे.

शहरातील बहुतांश रहिवासी इमारतींनी बसवलेली पाण्याचे मीटर नादुरुस्त असल्याने त्यांना सरासरी देयके पाठवण्यात येत असतात. जलवाहिनीतून इमारतीला दर महिना येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन त्यानुसार ही देयके देण्यात येत असतात. त्यामुळे दरवेळेस या इमारतींना ठरावीक रकमेची देयके येत असतात, परंतु जानेवारी महिन्यात आलेल्या देयकात तब्बल वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली असल्याचे पाहून रहिवाशांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाला येत असलेल्या तुटीमुळे नागरिकांना आकारण्यात येत असलेल्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायी समितीनही त्याला मान्यता दिली आहे, परंतु ही दरवाढ महासभेने मान्यता दिल्यानंतर एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे दरवाढ अद्याप लागू झालेली नसतानाही पाण्याच्या देयकात अचानक वाढ कशी झाली, अशा संभ्रमात नागरिक पडले आहेत.

दररोज पाणी मिळत असल्याचा फटका

  • मीरा-भाईंदर शहराची ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजना गेल्या वर्षी पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
  • ७५ दशलक्ष लिटरपैकी महापालिका सध्या दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे आणि सध्या ते पुरेसे आहे.
  • या वाढीव पाण्यामुळे नागरिकांच्या पाणीपुरवठय़ातही वाढ झाली आहे.
  • ल्ल पाणी योजना कार्यान्वित होण्याआधी नागरिकांना ४५ ते ५० तासांनी पाणीपुरवठा केला जायचा. त्यामुळे महिन्यातील १५ ते २० दिवसच पाणी मिळत होते.
  • शहराला आता मात्र अतिरिक्त पाणी मिळू लागल्याने पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक २४ ते ३० तासांवर आले आहे. परिणामी नागरिकांना जवळपास दररोज पाणीपुरवठा होऊ लागला आहे.
  • याचा परिणाम रहिवासी सोसायटय़ांना देण्यात येत असलेल्या सरासरी देयकांच्या रकमेवर झाला आहे.
  • प्रशासनाने इमारतींचे पाण्याचे मीटर बंद असले तरी त्या भागात मीटर सुरू असलेल्या इमारतींना दररोज मिळत असलेल्या पाण्याची नोंद करून त्यानुसार प्रशासनाने सरासरी देयकात वाढ केली आहे.
  • त्यामुळेच नागरिकांना २० ते २५ टक्के वाढीव देयके पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

आणखी वाढ होणार?

पाणीपुरवठय़ातील वाढीमुळे पाण्याच्या देयकात आधीच वाढ झालेली असतानाच आता दरवाढीला मंजुरी मिळाली तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीने पाण्याच्या दरात २० टक्के वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे. या दरवाढीवर महासभेने शिक्कामोर्तब केले तर एप्रिल महिन्यापासून येणाऱ्या देयकात आणखी २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या देयकात एकंदर ४० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.