विरारच्या ग्लोबल सिटीमधील रहिवासी जलवाहिन्यांच्या प्रतीक्षेत

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील हजारो नागरिक आजही पाण्यापासून वंचित आहे. या परिसरात इमारती उभ्या राहिल्या मात्र पाण्यासाठी जलवाहिन्याच टाकल्या नसल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. येथील अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रही मिळालेले नाही. जलकुंभ उभारण्याचे कामही रखडलेले आहे.

विरार पश्चिमेला काही वर्षांपूर्वी ग्लोबल सिटी नावाचा परिसर विकसित झाला. या परिसरात अनेक इमारती असून पाच हजारांहून अधिक लोकसंख्या आहे. या परिसरात क्रीडा संकुल, शॉपिंग मॉल, मनोरंजनासाठी पार्क आदी आहेत. मात्र पालिकेची नळजोडणी न मिळाल्याने येथील रहिवाशांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याने पाण्याच्या जोडण्या मिळालेल्या नाहीत. टँकरचे दूषित आणि महागडे पाणी दैनंदिन वापरासाठी मागवावे लागत आहे, तर पिण्याच्या बाटलीबंद पाण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहे. नुकताच या परिसरातील रहिवाशांनी पाण्यासाठी पालिकेवर मोर्चादेखील काढला होता. चार वर्षांपासून येथील रहिवासी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत.

ग्लोबल सिटीमध्ये क्लब वन येथे जलकुंभ बनवण्याचा ठेका मागील वर्षी देण्यात आला होता. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होऊन इथे जलकुंभ बनेल व नागरिकांना पाणी मिळेल असे आश्वासन पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांना देण्यात आले होते. परंतु अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही. पाण्याअभावी हा परिसर केवळ शोभेसाठी उरला आहे. पाणी नसल्याने इथल्या अनेक इमारतींमधील सदनिका रिकाम्या आहेत, तर अनेकांनी पाण्याअभावी घर सोडून अन्यत्र स्थलांतर केले आहे, असे स्थानिक रहिवासी सुदिप्ती सिंग यांनी सांगितले. जलवाहिन्या टाकल्या अथवा जलकुंभ बांधले तरी सर्व इमारतींना पाणी मिळणार नाही. येथील इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय नळजोडण्या देता येणार नाहीत.

ग्लोबल सिटीला पाणी देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. ग्लोबल सिटी परिसराला पाणी देण्यासाठी पूर्वेकडून पश्चिमेकडे रेल्वे ओलांडून जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. त्यासाठी शासानाकडून निधी अपेक्षित आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल.     – माधव जवादे, शहर अभियंता, वसई-विरार महापालिका