अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार; दुरुस्तीस विलंब

पालघर नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले तरी त्याचा फटका शहरातील पाणीपुरवठय़ाला बसला आहे. पालघर-माहीम रस्त्याखालून शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली असून रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळे ही जलवाहिनी विविध ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे शहरातील अनेक इमारतींमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्यास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पालघर-माहीम रस्त्याचे रुंदीकरणाचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. रुंदीकरणाच्या एका भागाचे काम पूर्ण होत असताना दुसऱ्या बाजूचे खोदकाम सुरू करण्यात आले आहे. हे खोदकाम जेसीबीच्या साह्य़ाने होत असल्याने पिण्याच्या अनेक जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे खणलेल्या खड्डय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले आहे. साचलेले पाणी बाजूला सारून दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे काम ठेकेदाराला सोपावण्यात आले असले तरी हे काम संथगतीने होत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. यामुळे अनेक सदनिका आणि गृहप्रकल्पांना काही दिवस पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

पाण्याची नवीन जोडणी नव्या मुख्य जलवाहिनीतून देण्यात येत आहे, तसेच रस्त्याच्या मधोमध असलेल्या जुन्या जलवाहिनीमधून होणारी गळतीची समस्याही लवकरात लवकर सोडवणार आहोत, असा विश्वास पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी व्यक्त केला.

माहीम रस्त्यावरील नगर परिषदेची मुख्य जलवाहिनी रस्त्याच्या कडेला आणि गटाराच्या बाजूला स्थलांतरित करण्यात आल्यामुळे जलवाहिनी फुटण्याची प्रकार वाढले आहेत. फुटलेल्या जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याच्या सूचना ठेकेदारांना आणि त्यावर देखरेख ठेवण्याच्या सूचना नगर परिषद कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.    – प्रशांत ठोंबरे, मुख्याधिकारी, पालघर नगर परिषद