|| प्रशांत मोरे

स्मार्ट सिटी होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील शहरांना लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेसे जलस्रोत नाहीत. पाणीटंचाईवर उपाय म्हणून सध्या आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवून त्यातून मार्ग काढला जाईल. मात्र नवे जलस्रोत न शोधल्यास जिल्ह्य़ातील पाणीसंकट अधिक गडद होणार आहे..

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळाचे सावट असले तरी कोकणात तशी परिस्थिती नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पडला असला तरी कोकणात पावसाने सरासरी गाठली. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे तर जुलै महिन्यातच भरली. मात्र तरीही ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून ठाणे-मुंबईत काही प्रमाणात पाणीकपातीला तोंड द्यावे लागणार आहे. कारण मुंबई महानगर प्रदेशातील मोठा भाग असलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील भविष्यकालीन पाणीपुरवठय़ासाठी प्रस्तावित करण्यात आलेले पोशीर, काळू, शाई आणि कुशिवली हे धरण प्रकल्प अद्याप मार्गी लागू शकलेले नाहीत. दुसरीकडे या शहरांची लोकसंख्या गेली काही वर्षे झपाटय़ाने वाढतच आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा आणि प्रत्यक्ष वापर यांचा काहीही ताळमेळ लागेनासा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षांच्या १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांना आठवडय़ातील किमान एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील वाढत्या लोकसंख्येसाठी सध्या तरी बारवी धरण विस्तारीकरण प्रकल्पाशिवाय अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने ते वाढीव पाणीही अजून उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे अगदी शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस पडूनही ठाणे जिल्ह्य़ातील पाणीसंकट कायम आहे. पाणी हे जीवन आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणताही विषय अधिक महत्त्वाचा असू शकत नाही. मात्र इतक्या संवेदनशील विषयावर ठाणे जिल्ह्य़ातील राजकीय नेतृत्व मात्र कमालीचे उदासीन आहे.

सध्या ठाणे जिल्ह्य़ातील नवी मुंबई आणि अंबरनाथचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही शहरांकडे पाणी पुरवठय़ाचे स्वत:चे स्रोत नाहीत. अंबरनाथ पालिकेच्या मालकीचे चिखलोली धरण आहे. सध्या या धरणातून साडेसहा दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. विस्तारीकरणानंतर या धरणात दुप्पट पाणीसाठा होणार आहे. मात्र आता या धरणाला औद्योगिक विभागातील कंपन्यांनी वेढले असल्याने धरणाच्या विस्तारीकरणाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवाय औद्योगिक विभागातील कंपन्यांनी पुरेशी प्रक्रिया न करता सोडलेल्या सांडपाण्यामुळे धरणातील पाणी दूषित झाले आहे. गेल्या मे महिन्यात याच कारणाने धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद करण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर पावसाळ्यात पुन्हा पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र आता पावसाने पाठ फिरविताच पुन्हा धरणातून पिवळसर रंगाचा काहीसा तेलकट पाणीपुरवठा होऊ लागला आहे. ते पाणी पिण्याच्या लायकीचे नाही. धरणातील पाणी दूषित होण्यास कारणीभूत असलेल्या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दस्तुरखुद्द पाणीपुरवठा राज्यमंत्र्यांनी गेल्या मे महिन्यात दिले होते. मात्र तरीही या कंपन्यांविरुद्ध कारवाई झालेली नाही.

चिखलोली धरणाप्रमाणेच बदलापूरजवळील भोज धरण शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी उपलब्ध झाले आहे. मात्र दोन वर्षे होऊनही इथून पाणी योजना राबविता आलेली नाही. दरम्यानच्या काळात देखभाल दुरुस्तीअभावी भोज धरणाला गळती लागली असून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. अंबरनाथमध्येच पश्चिम विभागात आयुध (शस्त्र) निर्माण कारखान्याच्या मागे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेला एक पाझर तलाव आहे. बदलापूरजवळील चोण गावात असाच एक तलाव आहे. मात्र हे सर्व जलसाठे दुर्लक्षित आहेत. ठाणे जिल्ह्य़ात वाढीव पाणीपुरवठय़ाचा अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने खरे तर अशा लहान-मोठय़ा जलसाठय़ांचे काटेकोरपणे संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र सध्या तरी दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.

गेल्या कित्येक वर्षांत ठाणे जिल्ह्य़ात नवीन जलस्रोत निर्माण होऊ शकलेला नाही. जिल्ह्य़ातील शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदी जिल्ह्य़ातील शहरांची लोकसंख्या दुपटीने वाढली. पाणीपुरवठय़ाचे स्रोत मात्र तेच आहेत. मुरबाडमधील एमआयडीसीचे बारवी धरण, पुण्यातील टाटा कंपनीचे आंदर धरण हे ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ाचे दोन मुख्य स्रोत आहेत. मात्र ज्या उल्हास नदीच्या माध्यमातून हे पाणी शहरांना पुरविले जाते, तिच्या संवर्धनाबाबतही अतिशय अनास्था आहे. काठावरील वाढत्या बेशिस्त नागरीकरणामुळे उल्हास नदीच्या पाण्याची शुद्धता धोक्यात आली आहे. चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदलापूर शहरातील बहुतेक सांडपाणी अजूनही कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात आहे. त्यात गेल्या काही वर्षांत वांगणी, नेरळची लोकसंख्याही वाढू लागली आहे. तेथील सांडपाणीही उल्हास नदीच्या पात्रात मिसळले जात आहे.  ठाणे जिल्ह्य़ातील पाणीपुरवठय़ाचा एकमेव स्रोत असल्याने खरेतर शासनाने तातडीने उल्हास नदीचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे.