आठवडय़ातून ३० तास पाणीपुरवठा बंद

गेला महिनाभर आठवडय़ातून एक दिवस पाणीकपात करूनही जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा आणि पुरवठय़ाचा ताळमेळ लागत नसल्याने पाटबंधारे विभागाने सव्वा दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आठवडय़ातून २४ऐवजी ३० तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

यामुळे रहिवाशांना आठवडय़ातून दीड ते दोन दिवस पाणीटंचाई सोसावी लागणार आहे. विविध प्राधिकरणे त्यांच्या मंजूर कोटय़ापेक्षा अधिक पाणी उलचत असल्याने १५ जुलैपर्यंतच्या पाणी पुरवठा नियोजनात २१ टक्के तूट येत आहे. त्यामुळे एक नोव्हेंबरपासून आठवडय़ातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतरही १५ टक्के तूट येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारीत पाणीसाठा आणि वापराचा आढावा घेऊन नवे धोरण जाहीर केले जाणार आहे.