टंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी न देण्याचा ठाणे महापालिकेचा विचार

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या चार तरण तलावांना कूपनलिकेच्या (बोअरवेल) साहाय्याने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तलावाकाठी कूपनलिका खोदून त्यातील पाणी पिण्यायोग्य करून ते तरण तलावात सोडले जाणार आहे. त्याच्या आराखडय़ाचे काम सुरू झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

धरणातील पाणीसाठा जुलैपर्यंत पुरावा यासाठी लघु पाटबंधारे विभागाने २२ टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आठवडय़ातून एकदा ३० तास बंद राहतो. त्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. असे असताना महापालिकेच्या चार तरण तलावांना दररोज सहा लाख लिटर पिण्याचे पाणी दिले जाते. त्यामुळे प्रशासनावर टीका होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर खासगी तरण तलावांच्या धर्तीवर महापालिकेच्या तरण तलावांनाही कूपनलिकेद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नियोजन आराखडा

तरण तलावांच्या परिसरात कूपनलिका खोदण्यात येणार आहे. कूपनलिकेचे पाणी पिण्यायोग्य व्हावे म्हणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल. कूपनलिकेद्वारे रोज पाणीपुरवठा केला जाणार नसून खासगी तरणतलावांप्रमाणे तेच पाणी शुद्ध करून पुनर्वापर करण्यात येणार असल्याचे कळते.