पाणी समस्येने उद्योजक हैराण

डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. औद्योगिक विभागात अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. या खराब रस्त्यांमुळे बाहेरील राज्यातून कच्चा माल घेऊन येणारे अवजड वाहनचालक डोंबिवली एमआयडीसीत येण्यास तयार होत नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. या रस्त्यांची डागडुजीकडे महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ लक्ष देत नसल्याने औद्योगिक विभागातील उद्योजक हैराण झाले आहेत.

कच्चा माल घेऊन येणारे अनेक वाहनचालक शिळफाटा रस्ता किंवा मुख्य सुस्थितीत रस्त्यावर वाहन उभे करतात. मग तेथून कच्चा माल एका टेम्पोत भरून तो उद्योजकांना स्वखर्चाने आपल्या कंपनीपर्यंत आणावा लागतो. यामध्ये नाहक आर्थिक फटका उद्योजकांना बसतो. एमआयडीसी निवासी विभागातील वर्दळीचे रस्ते सुस्थितीत आहेत. पण औद्योगिक विभागातील एकाही रस्त्याची पालिकेकडून किंवा एमआयडीसीकडून डागडुजी केली जात नाही, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. दोन्ही व्यवस्था उद्योजकांकडून कर जमा करतात. मग या निधीतून ही विकासाची कामे का केली जात नाहीत, असे प्रश्न उद्योजकांकडून केले जात आहेत. एमआयडीसी भाग आता पालिकेकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही कामे करून घ्या, अशी उत्तरे उद्योजकांना एमआयडीसीकडून दिली जात आहेत. महापालिकेकडे  गेल्यावर आमच्याकडे निधी नाही, तातडीने ही कामे करणे शक्य नाही, अशी ठोकळेबाज उत्तरे दिली जात आहेत. उद्योजक, कंपन्या हेही एमआयडीसी, पालिकेला कर जमा करतात. मग, अशी सापत्नपणाची वागणूक औद्योगिक विभागाला का दिली जात आहे, असा प्रश्न उद्योजक श्रीकांत जोशी यांनी केला.

अनेक परदेशस्थ उद्योजक एमआयडीसीतील कंपन्यांना भेट देतात. त्यावेळी रस्त्यांची दुरवस्था पाहून तेही आश्चर्य व्यक्त करतात. यावेळी ते बोलत असताना मान झुकविण्याशिवाय पर्याय राहत नाही, अशी खंत उद्योजकांनी व्यक्त केली.

पाण्याअभावी कंपन्या बंद

अशीच परिस्थिती पाण्याच्या बाबतीत आहे. पुरेशा दाबाने कंपन्यांना पाणीपुरवठा होत नाही. पुरेसे पाणी न मिळाल्याने अनेक वेळा उत्पादनाची काटकसर करावी लागते. यातून मग नुकसान सहन करावे लागते. कंपन्यांना आवश्यक पाणीपुरवठा एमआयडीसीकडून होणे आवश्यक आहे. पण तो होत नाही. अनेक कंपनी चालक पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने कंपनी बंद ठेवत आहे. तर काही जण दोन महिने कंपनी बंद ठेवायचा विचार करीत आहेत. नुकसान किती प्रमाणात आणि का सोसायचे असा प्रश्न उद्योजकांकडून केला जात आहे.