News Flash

पाण्यासाठी स्थलांतर!

ठाणे जिल्ह्यतील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई; धरणांच्या कुशीतील शहापुरात १३० गावांत टँकरने पाणी

|| किन्नरी जाधव/ सायली रावराणे

ठाणे जिल्ह्यतील अनेक गावांत भीषण पाणीटंचाई; धरणांच्या कुशीतील शहापुरात १३० गावांत टँकरने पाणी

सदैव दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाडय़ातील पाणीटंचाईमुळे तेथील ग्रामस्थ रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत असल्याचे वास्तव आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. मात्र, ठाणे शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईचे वास्तव त्याहूनही भीषण आहे. मुंबई-ठाण्यासह आसपासच्या शहरांची तहान भागवणारी मोठमोठी धरणे असलेल्या या तालुक्याच्या डोंगराळ भागातील अनेक गावे दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याने व्याकूळ होत आहेत. एवढेच नव्हे तर, केवळ पाण्यासाठी म्हणून खर्डी रेल्वे स्थानकाजवळील तीन-चार गावांतील ग्रामस्थांनी पाणी असलेल्या गावांत स्थलांतर केले आहे.

मोठमोठे जलाशय आणि धरणे असतानाही शहापूर तालुक्यातील डोंगराळ भागात दरवर्षी उन्हाळय़ात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. तालुक्यातील १३० गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये नळयोजना असली तरी ती केवळ नावापुरती आहे. जलवाहिन्या टाकणे आणि टाक्या उभ्या करण्याचे काम करण्यात आले असले तरी, या नळांतून क्वचित पाणी येते आणि तेही अतिशय कमी असते. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. सध्या मे महिन्यात तर येथील परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. दुर्गम भागातील काही पाडय़ांवरील रहिवासी लगतच्या गावांमध्ये स्थलांतरित होतात. शेजारील दळखण गावाच्या हद्दीत ते तात्पुरता आसरा घेतात. या गावात नळपाणी योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे.

चार दिवसांनी पाडय़ावरच्या सार्वजनिक नळाला पाणी आल्यावर पाडय़ावरच्या पन्नास घरातील ग्रामस्थांमध्ये पाणी भरण्यासाठी झुंबड उडते. या आदिवासी पाडय़ात सध्या वास्तव्यास असणाऱ्या वृद्धांचे खांदे पाणी वाहून  खचले. तरीही पाण्यासाठी करावे लागणारे कष्ट काही कमी झाले नाहीत. उलट हालाखीत आणखी वाढ झाली.  खर्डी रेल्वे स्थानकापासून २० ते २५ किलोमिटर अंतरावर असलेले  जरंडी, तळेखण, गोलभन, धामणी आणि मुसळ्याचा पाडा हे आदिवासी पाडे आहेत. खर्डी रेल्वे स्थानकातून काहीशा अंतरावर असलेला मुसळ्याचा पाडा हा पाण्याअभावी ओसाड झाल्याचे पाडय़ात पोहचताच क्षणी जाणवते. येथील सार्वजनिक नळाच्या समोर दिवसेंदिवस असलेली रिकामी भांडी या गावातील पाण्याच्या समस्यांची साक्ष देतात. शासनातर्फे राबविण्यात आलेल्या जल स्वराज्य योजनेअंतर्गत झालेला पुढाऱ्यांकडून झालेल्या भ्रष्टाचारामुळे गावात ही योजना यशस्वी झाली नसल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते.

 पाच दिवसांनी पाणी

‘आमचे सहा जणांचे कुटुंब. घरात नळ नाही, ४-५ दिवसांमधून जे काही पाणी मिळते, ते घराच्या कामांमध्ये वापरले जाते. घरातील इतक्या जणांचे कपडे धुण्यासाठी दररोज घरापासून कित्येक मैल लांब असलेल्या विहीरीवर येणे शक्य नसते. त्यामुळे आठ दिवसांचे कपडे एकदाच साठवायचे आणि पायपीट करत विहिरीवर कपडे धुण्यासाठी यायचे. विहिरीजवळ पोहोचल्यावर कोरडी विहीर पाहताना जीव रडवेला होतो,’ असे गावातील संध्या धनगर सांगतात.

विकासकांनी वाट अडवली

गुंतवणुकीसाठी काही विकासकांनी येथील काही गावांमध्ये घरे बांधली आहेत. सुट्टीच्या काळातच घरमालक या ठिकाणी जात असल्याने घरांभोवती  कुंपण बांधण्यात आले आहे. मात्र या कुंपणातूनच गावकऱ्यांचा विहिरीकडे जाण्याचा मार्ग असल्याने काही गावकऱ्यांना विहिरीकडे पाण्यासाठी जाणारा मार्ग बंद झाला आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले.

२०० मीटर खालीही पाणी बेपत्ता

शहापूर तालुक्यातील पाडय़ांमध्ये नळपाणी योजना पुरेशा प्रमाणात यशस्वी ठरली नसली तरी गावकऱ्यांची पाणी मिळवण्याची धडपड शासकीय योजनांच्या अपुऱ्या नियोजनामुळे व्यर्थ जात आहे. शहापूर तालुक्यातील अनेक गाव-पाडे डोंगराळ भागात असल्याने विहिरीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी शासनातर्फे देण्यात आलेल्या २०० मीटर खणण्याच्या मर्यादेचा येथील गावकऱ्यांना उपयोग होत नसल्याचे मुसळ्याचा पाडा येथे राहणारे शंकर पारधे यांनी सांगितले. डोंगराळ भागात २०० मीटर खणूनही पाण्याचा अंश सापडत नाही,  त्यापेक्षा अधिक खणण्याची मुभा शासनाकडून देण्यात आलेली नाही, त्यामुळे गावात विहिरी असूनही त्या कोरडय़ाच राहिल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

खर्डीजवळील काही पाडे डोंगराळ प्रदेशात असल्यामुळे येथे नळयोजना राबवण्यात अनेक अडथळे येत आहेत. या पाडय़ांना पाणी देण्यासाठी शासनातर्फे उपाययोजना आखण्यात येत आहेत. पाडय़ांना लवकरात लवकर पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा परिषद सक्रीय आहे.   -विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2018 12:27 am

Web Title: water scarcity in thane 8
Next Stories
1 वाहतूक प्रयोग फसला!
2 निविदेतील घोळ नालेसफाईच्या मुळावर!
3 विजेविना वसईकरांना दिवसभर ‘ताप’
Just Now!
X