समूह पुनर्विकास दूरच, आधी पाणी द्या; उद्योजकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मोठय़ा औद्योगिक वसाहतींमध्ये गणल्या जाणाऱ्या वागळे इस्टेट औद्योगिक परिसरात तीव्र पाणीटंचाई असून, काही उद्योगांना महिन्यातून फक्त चार-पाच दिवस पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या औद्योगिक परिसराचा पुनर्विकास दूरच; आधी पाणी द्या, अशी मागणी उद्योजकांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ठाणे शहराचा भाग असलेल्या वागळे इस्टेट औद्योगिक परिसरातील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली होती. या भेटीत या औद्योगिक पट्टय़ाचा विकास समूह पुनर्विकासाच्या धर्तीवर केला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्र्यांनी केली. यासंबंधीचा आराखडाही लवकरच तयार करण्यात येईल, असेही यावेळी ठरविण्यात आले. मात्र, वागळे इस्टेट परिसरातील विकासाचे प्रयत्न सुरू असताना तेथील उद्योगांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत असल्याचे उघड झाले आहे.

अनेक उद्योगांना महिन्यातून जेमतेम चार ते पाच दिवस पाणी मिळत असल्याची तक्रार ठाणे लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष अप्पा खांबेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीत एकूण ६०० औद्योगिक भूखंड आहेत. तिथे एक हजार लघु, मध्यम स्वरूपाचे उद्योग आहेत. या परिसरात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्याही मोठय़ा प्रमाणावर आहेत. दररोज हजारो कामगार या ठिकाणी कामानिमित्त येतात. येथील उद्योगांना भेडसावणारी  पाणीटंचाई दूर करा, अशी मागणी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

‘एमआयडीसी’चे दुर्लक्ष

वागळे इस्टेट औद्योगिक वसाहतीला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. वागळे इस्टेट परिसर हे बारवी धरणापासूनचे शेवटचे टोक आहे. गेल्या काही महिन्यांपासून येथील उद्योगांना भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागत आहे. याबाबत ‘एमआयडीसी’कडे वारंवार पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उद्योगवाढीसाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असताना वागळे इस्टेटसारख्सा औद्योगिक पट्टयात पाण्याअभावी उद्योग बंद करण्याची वेळ उद्योजकांवर येणे, अशोभनीय आहे, असे लघुउद्योजकांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.