08 March 2021

News Flash

महापालिका आयुक्त आणि महापौरांमध्ये खडाजंगी

सोमवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला.

(संग्रहित छायाचित्र)

पाणीटंचाईचे पडसाद सभागृहात उमटले

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने त्याचे पडसाद सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटताच आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले. मात्र, हे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचा दावा करत पुरेसे पाणी उपलब्ध होत असतानाही त्याचे नियोजन का होत नाही, याचे उत्तर देण्याची मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली. तसेच एकाच प्रभागात संपूर्ण जलमापके बसविण्याऐवजी विविध प्रभागांमध्ये थोडी थोडी का बसविली जात आहेत, असा जाबही त्यांनी विचारला. त्यावर जयस्वाल यांनी पुन्हा प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यात खडाजंगी झाली.

सोमवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. खर्डी आणि खिडकाळी या भागात नवी गृहसंकुले उभी राहत असून त्यांच्याकडून शुल्क आकारून त्यांना नळजोडणी दिली जात आहे. गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवरून ही जोडणी देण्यात येत आहे. त्यामुळे इमारतींना आणि गावांना पुरेसे पाणी मिळत नाही. काही ठिकाणी नळजोडण्या दिल्या आहेत. मात्र, त्यांची बिल वसुली केली जात नाही. याबाबत सभागृहात यापूर्वी मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्याठिकाणी पाहणी करण्यात आली होती. त्याचेही पुढे काहीच झाले नाही, असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. त्यापाठोपाठ सावरकरनगर-लोकमान्यनगर भागांतही पुरेसे पाणी मिळत नाही आणि याठिकाणी दूषित पाणी येत असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तसेच घोडबंदर परिसरातही पाणीटंचाईची समस्या असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

कोलशेत भागात एका नवीन इमारतीला अनधिकृतपणे नळजोडणी देण्यात आली असून या कामासाठी कोलशेतचा रस्ता दोन्ही बाजूने बंद ठेवण्यात आला होता, असा आरोप भाजपच्या नगरसेवक अर्चना मणेरा यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळात पाणीटंचाई नव्हती. मात्र, निवडणुका संपल्यानंतर आता पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका अर्पणा साळवी यांनी केला. या सर्व आरोपांना पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी उत्तरे दिली. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी  शहरातील पाणी नियोजनासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेसंबंधीची कामे हाती घेण्यात आली असून दोन ते अडीच वर्षांत ही कामे पूर्ण होताच शहरातील पाणी समस्या सुटेल, असा दावा त्यांनी केला. मात्र, हे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्याचा दावा करत पुरेसे पाणी उपलब्ध होत असतानाही त्याचे नियोजन का होत नाही, याचे उत्तर देण्याची मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली. तसेच एकाच प्रभागात संपूर्ण जलमापके बसवण्याऐवजी विविध प्रभागांमध्ये थोडी का बसविली जात आहेत, असा जाबही त्यांनी विचारला. त्यावर आयुक्त जयस्वाल यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यात खडाजंगी झाली.

जलमापकावरून प्रशासन कात्रीत

ठाणे शहरातील अनेक झोपडपट्टय़ांमध्ये ही जलमापके बसवण्यात येत असून काही ठरावीक घरांना ही जलमापके बसवण्यात आली आहेत. त्यामुळे ज्या घरांना जलमापके बसवली नाहीत, त्यांच्याकडून बिले कशी वसूल करणार. तसेच सर्वच प्रभागांमध्ये एकाच वेळी थोडी-थोडी जलमापके बसविण्याऐवजी प्रभागानुसार जलमापके बसविण्याचे कामे पूर्ण करा, अशी मागणी महापौर शिंदे यांनी केली. त्यावर पहिल्या टप्प्यात वाणिज्य वास्तू आणि गृहसंकुलांना जलमापके बसवण्याचे आदेश दिले आहेत, असे आयुक्त जयस्वाल यांनी स्पष्ट केले. मात्र, झोपडपट्टय़ांमध्ये ही जलमापके बसविली जात असल्याची बाब सर्वपक्षीय नगरसेवकांनी उघड करत प्रशासनाला कात्रीत पकडले. अखेर याबाबत माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:45 am

Web Title: water scarcity situation hall akp 94
Next Stories
1 नगरपालिकांची संकेतस्थळांवर माहितीचा अभाव
2 एसीबी चौकशीसाठी पूर्वपरवानगी देण्यास पालिका तयार
3 नायजेरियन उपद्रवाला लगाम
Just Now!
X