२७ गावांतील पाण्याचा प्रश्न बिकट
यंदाच्या अवर्षणाची झळ राज्यातील ग्रामीण भागापाठोपाठ शहरांनाही बसू लागला असतानाच अर्धनागरीकरणाचे दुष्परिणाम भोगत असलेल्या शहरांनजीकच्या गावांना याचा आणखी फटका बसू लागला आहे. कल्याण-डोंबिवली नजीकच्या २७ गावांच्या परिसरात अपुरा पाणीपुरवठा आणि पाणीकपात यांमुळे येथील रहिवाशांना गावांतील खदानी आणि विहिरींच्या आधारे पाण्याची गरज भागवावी लागत आहे. मात्र, या परिसरात जवळपास साठेक जिवंत विहिरी असतानाही अनेक विहिरींचे पंप बंद पडल्याने तसेच स्वच्छतेअभावी त्यातील पाणी खराब झाल्याने तेही वापरता येईनासे झाले आहे. त्यामुळे आता तहान भागवायची कशी, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. या इमारतींमधील घरांना गावाच्या वाटय़ाला येणाऱ्या पाण्यातूनच पुरवठा केला जात असल्याने सर्वत्र कमी दाबाचा पाणीपुरवठा होण्याची समस्या भेडसावू लागली आहे. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतींनी गावातील विहिरी पुनरुज्जीवित करण्याचे ठरवले. २७ गावांमध्ये एकंदरीत ६५ ते ६७ विहिरी आहेत. त्यातील सत्तर टक्के विहिरी या वापरात आहेत. ज्या विहिरींना बाराही महिने पाणी आहे, त्या स्वच्छ करून त्यावर ग्रामपंचायत निधीतून मोटार बसवून या पाण्याचा वापर गावकरी करूलागले. या मोटारींची व जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत नियमित करत असे, पण आता २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाल्याने या गावांना मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असल्याने या पंपाची दुरुस्ती केली जात नाही. ‘नांदिवली पंचानंद भागात तीन जुन्या विहिरी असून या तिन्ही विहिरींवरील मोटारी बंद पडल्या आहेत. पालिकेला याविषयी विचारणा केली असता विहिरींवरील पंपाची नादुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या आर्थिक अंदाजपत्रकात तरतूद नसल्यामुळे या पंपाची दुरुस्ती करता येणार नाही, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात येते,’ असे स्थानिक नगरसेविका प्रेमा म्हात्रे यांनी सांगितले. गावे पालिकेत समाविष्ट झाल्याने प्रत्येक काम करण्यासाठी आता पालिकेची मंजुरी घ्यावी लागते. त्यातही पालिका त्यावर प्रस्ताव तयार करणार तो मंजूर झाला, त्यास निधी प्राप्त झाल्यानंतर ही कामे करण्यात येणार तोपर्यंत नागरिकांनी करायचे काय, असा सवालही त्यांनी केला.

विहिरीत पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ मोटार नादुरुस्तीमुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. ज्या गावात विहिरी नाहीत तेथील लोक खदानीचा आसरा घेत आहेत. खदानीत बुडून माय लेकराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे, असे असताना मोटार बंद पडल्यामुळे येथील महिला बादलीने पाणी विहिरीतून उपसत आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश
जोपर्यंत महापालिका प्रशासनाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होत नाही, तोपर्यंत २७ गावांमधील पाणीपुरवठा एमआयडीसीने पूर्ववत ठेवावा, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी जिल्हा नियोजन बैठकीस दिले. २७ गावांच्या पाणी समस्येबाबत कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन तसेच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठकही आयोजित करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. महापालिकेतून वेगळ्या झालेल्या २७ गावांना एमआयडीसीतर्फे अपुरा पाणीपुरवठा होत होता. जिल्हा नियोजन बैठकीत या प्रश्नासंदर्भात लोकप्रतिनिधींनी एमआयडीसी तसेच महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर जोपर्यंत महापालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत २७ गावांना पूर्वीप्रमाणेच पाणी द्यावे, असा निर्णय घेण्यात आला.