नायगाव पूर्वेत तीव्र पाणीटंचाई; जुचंद्र, पेल्हार, चंद्रपाडा गावांना पाझर तलाव हाच जलस्रोत

नायगाव पूर्वेच्या पेल्हार, चंद्रपाडा या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून आठवडय़ाला केवळ दोनदा आणि तेही दीड तास पाणी येत असल्याने रहिवाशांचे तीव्र हाल होत आहे.

नायगाव पूर्वेला असणाऱ्या जुचंद्र, चंद्रपाडा आणि वाकिपाडा या गावांसाठी पाझर तलाव हा पाण्याचा एकमेव स्रोत आहे. ग्रामपंचायत काळापासून या तलावातून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत आहे. या भागाची लोकसंख्या आता ६० हजारांवर गेली असून पाण्याची टंचाई भेडसावू लागली आहे. त्यातच पाझर तलाव आटल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. या तलावातून आठवडय़ाला केवळ दोन दिवस एकूण दीड तास पाणी मिळते. ते पाणी अपुरे पडू लागल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. पाझर तलावातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी आता त्याचे खोदकामही सुरू करण्यात आलेले आहे. पेल्हार धरणातील पाणी जुचंद्र गावाला देण्याची मागणी करण्यात आली होती. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ग्रामस्थांची गरज लक्षात घेता ही मागणी मान्य केली आहे. तात्पुरत्या स्वरूपात पेल्हार धरणातील पाणी जुचंद्र गावाला देण्यास संमती दिल्यानंतर हे काम सुरू झाले आहे. गावासाठी अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या पडून आहेत. त्याची डागडुजी करून पेल्हार धरणातले पाणी दिले जाणार असल्याची माहिती नगरसेवक कन्हैया भोईर यांनी दिली.

जुचंद्रसह ६९ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठा योजना आखली होती. पण रस्त्याच्या कामामुळे जलवाहिन्या फुटल्याने काम रखडले. उर्वरित कामही अर्धवट राहिल्याने योजना रखडली होती. आता पेल्हार धरणातील पाणी जुचंद्रकरांना मिळणार असून चंद्रपाडा आणि वाकिवाडा गावांना पाझर तलावाचे पाणी किमान पावसापर्यंत पुरू शकणार आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे.