20 January 2018

News Flash

धरण काठोकाठ, तरीही पाणीटंचाई

ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण जुलै महिन्यातच भरून वाहू लागले आहे.

प्रतिनिधी ठाणे | Updated: August 11, 2017 2:31 AM

ठाण्यातील अनेक भागांत दोन दिवसांआड पाणीपुरवठा; विजेच्या लपंडावाचा फटका

मुंबईसह आसपासच्या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने पाण्याची चिंता मिटली असली तरी भर पावसाळ्यात शहराच्या अंतर्गत भागात पाण्याची समस्या आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकमान्यनगर, वागळे इस्टेट परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण जुलै महिन्यातच भरून वाहू लागले आहे. उल्हास नदी प्रवाही करणाऱ्या आंदर धरणातही मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, वागळे इस्टेट परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याच्या सततच्या घटनांमुळे या भागांना सध्या दोन दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

ठाणे शहराच्या मुख्य भागात मुबलक पाणीपुरवठा होत असला तरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, किसननगर, इंदिरानगर भागात पाण्याची समस्या कायम आहे. गेल्या आठवडय़ापासून या भागात दोन दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. लोकमान्यनगर, श्रीनगर, एअरफोर्स परिसराला वागळे इस्टेट येथील पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. मात्र वागळे इस्टेट, इंदिरानगर परिसरात असणाऱ्या वीज समस्येमुळे पाणी वितरित करताना अडथळा होत असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळवण्यात येत आहे.

लोकमान्यनगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट हा परिसर डोंगराच्या पायथ्याशी येतो. मुख्य शहरापासून लांब असलेला हा परिसर चढणीच्या मार्गावर आहे. यामुळे पाणीपुरवठा झाल्यास काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असतो. एकदा आलेले पाणी पुन्हा कोणत्या दिवशी येईल, याची शाश्वती लोकमान्यनगरमधील नागरिकांना नसते. त्यामुळे पुरेसा साठा करून ठेवणे, काही वेळेस दैनंदिन व्यवहारासाठी पाणी साठा नसणे अशा समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. दोन दिवस पाणी उपलब्ध झाले नाही तर पिण्यासाठीही साठवलेल्या पाण्याचा उपयोग करावा लागतो, असे या भागात राहणाऱ्या कविता लोखंडे यांनी सांगितले.

शुक्रवार-शनिवारी अधिक त्रास

वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, इंदिरानगर परिसरात शुक्रवारी दिवसभर विजेचा पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे या भागात पाणीपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या भागातील इमारतींमध्ये पाणीपुरवठा झाल्यावर इमारतींमध्ये गच्चीवर असणाऱ्या टाक्यांमध्ये मोटर लावून पाणी चढवले जाते. त्यानंतर घरोघरी पाणीपुरवठा होत असतो. मात्र पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाच्या वेळीच वीजपुरवठाही खंडित होत असल्याने पाणी असूनही इमारतींच्या टाक्यांमध्ये चढत नाही.

वागळे इस्टेट परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने त्याचा निश्चितच परिणाम पाणीपुरवठय़ावर होत आहे. या भागातील विजेची समस्या सोडवण्यासाठी महावितरणशी समन्वय साधून लवकरच या भागात विजेचे एक्स्प्रेस मीटर बसवण्यात येणार आहेत. या मीटरमुळे परिसरातील विजेची समस्या दूर होऊन पाणीपुरवठा सुरळीत होईल.

रवींद्र खडताळे , पाणीपुरवठा विभाग, ठाणे महानगरपालिका

First Published on August 11, 2017 2:31 am

Web Title: water shortage in thane monsoon in thane
  1. R
    R. S.
    Aug 11, 2017 at 3:16 pm
    मग पाणी जाते कुठे, पाण्याचा काळा बाजार तर होत नाही ना, आम्ही दिव्याला राहतो पाणी ३ दिवसांनी येते आणि ते पण मुबलक नाही, पाण्याला घाण वास येतो, आम्ही मुकाट्याने न करतो, म्युनिसिपालिटी जनतेचे भले पहाते कि स्वतःचे, हे कोणी तरी तपासून पाहावे लागेल.
    Reply