लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे आयुक्तांचे स्पष्टीकरण; राजकीय पक्षांकडून मात्र अधिकाऱ्यांवरच आगपाखड

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात जी तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे त्यास चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आलेली पाणीपुरवठा योजना जबाबदार असून त्यावर तोडगा काढणे कठीण असल्याचे परखड मत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

उल्हासनगर शहरात आतापासूनच तीव्र पाणीटंचाई भेडसावत असून उल्हासनगर कॅम्प ४ आणि ५ परिसरात सलग तीन ते चार दिवस पाणी येत नाही. यामुळे संतप्त झालेले लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांनी मनपाला लवकरात लवकर पाणी वितरणात सुधारणा करा अन्यथा आंदोलनास सामोरे जा, असा इशारा दिला होता. मात्र पाणी वितरणात कोणत्याही प्रकारे सुधारणा झाली नसल्याचे लक्षात येताच अपक्ष नगरसेवक विजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प ५ मध्ये हंडा मोर्चा काढून रास्ता रोको करण्यात आला. या प्रकरणी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पाणीपुरवठा योजनेसाठी ३०० कोटी रुपये खर्च करूनही या योजनेचा बोजवारा उडाला आहे. ही योजना राबविण्याचे कंत्राट ‘कोणार्क’ कंपनीला दिले होते. मात्र या कंपनीचे काम असमाधानकारक असल्याचे स्पष्ट मत आयुक्त निंबाळकर यांनी अनेकदा व्यक्त केले होते. या संदर्भात निंबाळकर यांना विचारले असता, मुळात पाणीपुरवठा योजनाच चुकीच्या पद्धतीने राबवली आहे. त्यामुळे ही योजनाच पाणीटंचाईला कारणीभूत आहे. सुरुवातीपासूनच ही यंत्रणा हाती असती तर त्यात काही सुधारणा करता येणे शक्य होते, अशी अप्रत्यक्ष चपराक पाणी पुरवठा योजना राबविणाऱ्या ‘कोणार्क’ कंपनी व कंपनीचे हितसंबंध जोपासणाऱ्या राजकीय नेत्यांना लगावली. या योजनेत प्रचंड गोंधळ झालेला तर आहेच, शिवाय लोकांनीही नव्या जलवाहिन्या आपल्या घरात घेतल्या आहेत. मात्र जुन्या जलवाहिन्या अजूनही कायम ठेवल्या आहेत. या गोष्टीचे कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने समस्या उद्भवत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

पाणीप्रश्नावरून शिवसेना आक्रमक

‘एमआयडीसी’ने कोणतीही सूचना न देता २० टक्के पाणीकपात सुरू केली आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, सभागृह नेते धनंजय बोडारे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी नगरसेवकांनी डोंबिवली ‘एमआयडीसी’ वर धडक दिली. अभियंता नन्नावरे हे उडवाउडवीची आणि उद्धट भाषेत उत्तरे दिल्याने शिवसेनेचा संयम सुटला आणि नन्नावरे यांच्या मोबाईल, लॅपटॉपची तोडफोड केली. महामार्गावर असणारे ढाबे, हॉटेलमध्ये पाण्याचा भरपूर साठा आहे. त्यांच्याशी अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का, असा सवाल राजेंद्र चौधरी यांनी उपस्थित केला. हीच परिस्थिती राहिल्यास पुढे याविरुद्ध मोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.