ठाणे महापालिकेचे जलवितरणाचे गणित कोलमडले; नवीन बांधकामांना मात्र परवानगी देण्याचा धडाका

आधीच सध्या असलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी होत असलेला पाणीपुरवठा आणि त्यात नवनवीन विकासप्रकल्पांना मंजुऱ्या देण्याची ठाणे महापालिकेची घाई यामुळे ठाणे शहरातील विशेषत: घोडबंदर आणि दिवा परिसरात पाणीपुरवठय़ाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घोडबंदर मार्गावर बडय़ा बिल्डरांसाठी हिरवा गालिचा अंथरणाऱ्या शासकीय यंत्रणांनी दिवा आणि २७ गावांच्या परिसरातही पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना विकास प्रकल्पांना मंजुऱ्या देण्याचा धडाका लावल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आधीच येथील वसाहती व वस्त्यांना कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असताना नव्याने तयार होणाऱ्या इमारतींना पाणी कुठून मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पाश्र्वभूमीवर उच्च न्यायालयाने घोडबंदर परिसरातील नवीन बांधकामांना मनाई केली आहे.

घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षांत अनेक मोठय़ा बिल्डरांच्या विशेष नागरी वसाहती उभ्या राहिल्या आहेत. याच भागात बिल्डरांना वाढीव चटईक्षेत्र बहाल करत नवे प्रकल्प उभारण्यासाठी महापालिका हिरवा गालिचा अंथरताना दिसत आहे. असे असले तरी मोठय़ा वसाहतींना लागणारे वाढीव पाणी कोठून पुरवायचे या प्रश्नाची उकल अजूनही महापालिकेस करता आली नसून ऐन उन्हाळ्यात येथील काही विशेष नागरी वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र होते.

thane-construction-chart

घोडबंदर मार्गावरील मोठय़ा वसाहतींना पाणीटंचाईचे चटके बसत असताना दिवा आणि २७ गावांच्या परिसरालाही हीच अवकळा आली असून पाण्याचे कोणतेही ठोस नियोजन नसताना शीळ-कल्याण मार्गावर बडय़ा विकासकांच्या प्रकल्पांना मंजुऱ्या देण्याचा धडाकाच शासकीय यंत्रणांनी लावला आहे. घोडबंदरप्रमाणे शीळ मार्गाचा विकास करण्याची ठाणे महापालिकेची योजना   असून येथील बराचसा कारभार बिल्डरांना समोर ठेवूनच सुरू आहे. असे असताना येथील गावांची तहान भागविण्यासाठी वाढीव पाण्यासाठी एमआयडीसीकडे आर्जव करणाऱ्या महापालिकेस बिल्डरांच्या प्रकल्पांना मंजुऱ्या देताना पाणी नियोजनाचा विसर पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

साठवणूक क्षमता वाढविण्यावर भर

केंद्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण अभियांत्रिकी संघटनेने (सीपीएचईईओ) ठरवून दिलेल्या मानांकनानुसार शहरामध्ये पाणीपुरवठय़ाच्या तुलनेत ३३ टक्के साठवणूक क्षमता असणे गरजेचे आहे. ठाणे महापालिकेकडे २५ टक्के पाणी साठवणूक क्षमता आहे. त्यामुळेही शहरातील वितरण व्यवस्थेवर परिणाम होत असल्याने महापालिकेने आता पाणी साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. पालिकेकडे ५१ जलकुंभ असून १२ जलकुंभ नव्याने बांधण्यात येत आहेत.

पंचवार्षिक आराखडा

घोडबंदर मार्गावरील पाणीटंचाईचा प्रश्न उग्र होऊ लागल्यानंतर पालिकेला जाग आली असून यंदाच्या अर्थसंकल्पात ठाणे शहराच्या सक्षम पाणीपुरवठय़ा साठी पंचवार्षिक आराखडा आखण्यात आला आहे. त्यानुसार ठाणे व वागळे भागात २४ तास पाणीपुरवठा योजना तर घोडबंदर आणि मुंब्य्रामध्ये पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेचे पुनर्नियोजन करण्यात येणार आहे.  त्यामध्ये जुन्या जलवहिन्या बदलणे, गळतीचे प्रमाण रोखणे आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे, स्काडा यंत्रणा उभारणे अशी कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय, नळ जोडण्यांवर मीटर बसविण्यात येणार आहेत.