नीलेश पानमंद / किशोर कोकणे

घोडबंदरपासून नौपाडय़ापर्यंत शहरभर पाणीटंचाई; उच्चभ्रू वसाहतींनाही टँकरने पाणी पुरवण्याची वेळ

विकासाच्या नावाखाली वाढीव चटई क्षेत्राची खरात करून धडाधड बांधकाम परवानग्या देणाऱ्या ठाणे महापालिकेला या वसाहतींना पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात मात्र पुरते अपयश आले आहे. वागळे इस्टेट, वर्तकनगर, लोकमान्यनगर, सावरकरनगर अशा झोपडपट्टीबहुल भागांत तीव्र पाणीटंचाई असतानाच घोडबंदरमधील उच्चभ्रू वसाहती आणि इमारतींनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

संपूर्ण शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका टँकरच्या दिवसाला ४८ फेऱ्या होत असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच २६ फेऱ्या माजिवडा आणि वर्तकनगर या दोन्ही प्रभाग समिती क्षेत्रांत होत आहे. या दोन्ही भागांत गेल्या काही वर्षांत मोठी गृहसंकुले उभी राहिली असून गेल्या काही दिवसांपासून या फेऱ्या आणखी वाढवाव्या लागत आहेत. मध्यंतरी उच्च न्यायालयाने शहरातील पाणी नियोजनासंबंधी महापालिकेला चपराक लगावत नव्या बांधकामांना परवानगी देण्यास स्थगिती दिली होती. यावर महापालिकेने सातत्याने पाठपुरावा करून पाणी नियोजनाचा आराखडा न्यायालयापुढे सादर केला होता. कागदावर भरभक्कम वाटणारा हा आराखडा किती तकलादू आहे याचा अनुभव सध्या ठाणेकर घेत असून पाणीपुरवठय़ाचे नियोजन अनेक भागांत बिघडले असल्याच्या तक्रारी आता पुढे येऊ लागल्या आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. हे स्रोत जिल्ह्य़ातील भातसा आणि उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा करतात. या नदीपात्रातील पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी लघू पाटबंधारे विभागाने गेल्या काही महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. यामुळे सुरुवातीला शहराचा पाणीपुरवठा पंधरा दिवसांतून एकदा आणि त्यानंतर आठवडय़ातून एकदा बंद ठेवण्यात येत होता. या कपातीनंतर शहरात पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहराच्या विविध भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

शहरातील डोंगर भागावर झोपडय़ा उभारण्यात आल्या असून या भागांमध्ये कपातीमुळे पाणीटंचाई निर्माण झाल्याचे चित्र होते. मात्र, आता घोडबंदर भागातील मोठय़ा वसाहतींना पाणीटंचाईची समस्या जाणवत असल्याचे समोर आले आहे.

मोफत टँकरचे कौतुक कशाला?

ठाणे महापालिकेच्या ताफ्यात पाण्याचे सहा टँकर असून आणखी १९ खासगी टँकरची मदत घेण्यात येत आहे. ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणीही मोफत पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली. मात्र मोफत टँकरचे हे कौतुक काय कामाचे, असा सवाल रहिवासी करत आहेत.

खासगी टँकरवर निर्बंध नाही..

ठाणे महापालिका खासगी टँकरचालकांकडून प्रत्येकी सातशे रुपये घेऊन त्यांना पाणीपुरवठा करते. मात्र या चालकांकडून तेच पाणी अडीच हजार रुपयांमध्ये विक्री केले जात आहे. यावर मात्र महापालिकेचे कोणतेही निर्बंध नसल्याचे दिसून येत आहे.