|| सुहास बिऱ्हाडे

विरार पूर्वेकडील नागरिकांना सूर्याचे पाणी मिळणार

वसई : विरार शहरातील पापडखिंड या ४० वर्ष जु्न्या धरणातील पाणी यापुढे पिण्यासाठी न देण्याचा निर्णय पालिकेने मंगळवारी जाहीर केला. हे धरण प्रदूषित झाले असून त्यातील पाणी नागरिकांच्या आरोग्याला अपायकारक ठरत असल्याने येथील पाणीपुरवठा बंद करावा, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. विशेष म्हणजे २०१८ मध्ये तत्कालिन आयुक्तांनी या धरणातील पाणी पिण्यासाठी देऊ नये, असे आदेश काढल्यानंतरही पाणीपुरवठा सुरू होता.

विरार शहराच्या पूर्वेला पापडखिंड धरण आहे. १९७२ साली हे धरण बांधण्यात आले होते. तेव्हा विरारची लोकसंख्या कमी असल्याने विरार मधील नागरिकाना या धरणातून दररोज एक दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जात होता. सध्या वसई-विरार शहराची लोकसंख्या पालिकेच्या आकडेवारीनुसार २४ लाख एवढी आहे. वसई विरार शहराला दररोज २३१ दशलक्षलीटर पाणी पुरवठा महापालिकेमार्फत केला जातो त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्षलीटर, उसगाव २०,  पेल्हार १० , आणि पापडखिंड एक दशलक्ष लीटर अशा प्रकारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात मुबलक पाणी आल्यानंतर पालिकेने हे धरण बंद करून या धरणात वॉटर पार्क तयार करण्याची योजना बनवली होती. २०१८ साली पालिकेकडून तसा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. (ही बाब ‘लोकसत्ता’ने समोर आणून पालिकेला हा प्रयत्न हाणून पाडला होता) धरण बंद करून त्यावर वॉटर पार्क होणार असल्यानंतर जनक्षोभ उसळला होता. त्यांतर पालिकेने ही योजना रद्द केली होती. मात्र धरणातील पाण्याचा वापर सुरूच होता. मात्र गेल्या काही वर्षापासून या धरणात छट पुजा केली जात होती आणि तेल धरणाच्या पाण्यात सोडण्यात येते होते. त्यामुळे पाणी दूषीत झाले होते. पर्यटकांकडून धरणात कचरा टाकला जात होता. तसेच या धरणाता आत्महत्या केलेल्या लोकांचे कुजलेले मृतदेह देखील सापडले होते. या धरणाच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्व प्रकारच्या प्रदूषणामुळे हे पाणी दूषीत झाल्याने ते पाणी नागरिकांना देऊ नये, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मंगळवारी नागरिकांनी याबाबात पालिकेच्या अधिकायांची भेट घेतली. पापडखिंड धरणाचे पाणी न देता सुर्याचे पाणी मिळावे, अशा मागणीसाठी सुदेश चौधरी, रिपाईचे गिरीश दिवाणजी यांनी प्रयत्न केले होते. त्याबाबत आयुक्तांकडे निवेदन देऊन परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर मंगळवारी पापडखिंड धरणाचे पाणी नागरिकांना न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

धरणाची अवस्था वाईट आहे. पाणी दूषीत असल्याने नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे त्यांना सुर्या योजनेतून पाणी पुरवठा केला जाणार आहे, असे उपायुक्त शंकर खंदारे यांनी सांगितले. पापडखिंड धरण लहान आहे. त्याचे पाणी जानेवारी नंतर कमी होत असते तेव्हा आम्ही सुर्याचेच पाणी देतो. आता मात्र विरार पूर्वेकडील नागरिकांना कायमस्वरूपी सुर्याचेच पाणी दिले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता प्रदीप पाचंगे यांनी सांगितले.

पापडखिंड धरणाचा इतिहास

विरार शहराची लोकसंख्या १९७२ साली १५ हजार एवढी होती. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर राज्य शासनातील तत्कालीन मंत्री भाऊसाहेब वर्तक यांनी पापडखिंड धरण मंजूर करवून घेतलं होतं. ८० नंतर लोकसंख्या वाढू लागले. त्यांनंतर १९८४ साली नाालसोपारा पुर्वेला पेल्हार धरण बांधण्यात आले. या पेल्हार मधून ६ दशलक्ष लिटर्स आणि उसगाव मधून १ दशलक्ष लिटर्स असे पाणी विरारकरांना मिळत होते. १९९१ साली दांडेकर समितीच्या अहवालानंतर उसगाव धरणांचे काम हाती घेण्यात आले या उसगाव धरणातून विरारला पाणी मिळू लागलं. २००० साली तत्कालीन विलासरा देशमुख यांच्या सरकारला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सुर्या प्रकल्प मंजूर करवून घेतला आणि शहरात सुर्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील शंभर दशलक्ष लिटर्स पाणी आलं.