टाकीभर पाण्याला पाचशे रुपयांचा दर

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीचा महत्त्वाचा भाग असलेल्या दिवा-दातिवली परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले असून पाण्याच्या शोधात या गावातील नागरिक दाही दिशा हिंडत असताना अनेक ठिकाणी पाणी व्रिकीचा काळा बाजार सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिवा गावातील काही राजकीय नेत्यांचा आश्रय लाभलेली काही तरुण मंडळी या व्यवसायात उतरली असून मुंब्रा-दिवालगत असलेल्या चाळींमध्ये चक्क ५०० रुपये प्रति कॅन याप्रमाणे पाणी विकले जात आहे. आगासन निळजे गावामधून टाकण्यात आलेल्या जल वाहिनीतून पाणी चोरायचे आणि या चाळींमध्ये आणून विकायचे, असे प्रकार वाढीस लागले असून बेकायदा बांधकामांचे आगार असलेल्या या भागात सुरू असलेल्या पाणी विक्रीकडे महापालिका प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे चित्र आहे.

वर्षांनुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या दिवा परिसराच्या विकासासाठी ठाणे महापालिकेने गेल्या काही वर्षांपासून आर्थिक तरतूद करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या भागातील पायाभूत सुविधांसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या माध्यमातून या ठिकाणी रस्ते, पूल, मलवाहिन्या, जलवाहिन्या टाकण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. एकीकडे दिव्यातील चित्र पालटण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र येथील भीषण पाणीटंचाई आणि त्या माध्यमातून होणाऱ्या पाणी चोरी, विक्रीकडे मात्र प्रशासनाने कानाडोळा केला आहे.

दिव्यातील जीवदानी नगर, मुंब्रा देवी कॉलनी, एन.आर. नगर, नागवाडी या भागात पाण्याची सर्रास चोरी होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या भागात महापालिकेच्या जलवाहिन्यामधून ही चोरी होत असल्याने आधीच कमी दाबामुळे हैराण असलेल्या अनेक वसाहतींमध्ये पाण्याचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. याचा गैरफायदा घेत गावातील काही मंडळींनी पाणीचोरी करून मनमानी दरात त्याची विक्री सुरू केली आहे. एमआयडीसीच्या जलवाहिन्या फोडून त्यातून पाण्याच्या टाक्या भरून घेण्याचे प्रकार वाढीस लागले असून लहान टेम्पोमध्ये पाण्याचा टाक्या भरून ५०० ते १००० रुपयांना विक्री करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

महापालिकेतर्फे जलवाहिन्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली तरी दिवा शहराला पाणी कमीच पडत असल्याचे दिव्यातील नागरिक अभय वाहिले यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राज्याचे गृहमंत्री रणजीत पाटील यांनी दिव्यातील अनधिकृत नळजोडणीवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र महापालिकेतर्फे वरवर कारवाई करण्यात आली असून वारंवार पाणी चोरीच्या तक्रारी करूनदेखील पालिका याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विजय भोईर यांनी केला. दरम्यान, जोपर्यंत पाणी चोरी कमी होत नाही तोपर्यंत पालिकेतर्फे जलवाहिन्या वाढवून उपयोग होणार नाही. पालिकेमध्ये अनेक वेळा तक्रारी करूनदेखील पाणी चोरी कमी होत नसून दिवसेंदिवस दिव्यातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणीदेखील महाग होत आहे, असे येथील भाजपचे पदाधिकारी आदेश भगत यांनी सांगितले.

पाणीविक्रीची ठिकाणे

श्लोकनगर, मुंब्रादेवी कॉलनी, मुंब्रादेवी कॉलनी फेस -२, बी. आर. नगर दिवा- आगासन रोड, साळवी नगर, जीवदानी नगर  साबेगाव, सद्गुरू नगर, दिवा- आगासन रोड

महापालिकेमार्फत कोणतेही दुर्लक्ष होत नसून दररोज या पाणी चोरीवर कारवाई करण्यात येत आहे. दिवा शहरातील कोणत्याही परिसरात पाणी चोरी करताना आढळून आल्यास त्वरित माहापालिकेशी संपर्क  साधावा

संदीप माळवी, सहा.आयुक्त, ठाणे महापालिका