भाईंदरमधील मांडवी भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा; सुरक्षेसाठी पाण्याच्या पिंपांना टाळे

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : मौल्यवान वस्तू कोणी चोरून नेईल या भीतीने कुलूप लावून सुरक्षित ठेवली जाते. मात्र भाईंदरच्या मांडवी गावामध्ये चक्क पाण्याच्या पिंपांना कुलूपबंद करून ठेवण्यात येत आहे. या गावातील चाळींना गेल्या १४ वर्षांपासून पाणी नसल्याने टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र ते पाणीदेखील पुरेसे नसल्याने स्थानिक रहिवासी पाणीचोरी होऊ नये म्हणून पाण्याच्या पिंपाला कुलूप लावून ठेवत आहेत.

मीरा रोड पूर्वेला काशिमीरा येथील मांडवी गाव आहे. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या  गावाची लोकसंख्या साडेचार हजार आहे. या गावातील चाळवासियांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. आधी गावाची लोकसंख्या कमी असल्याने गावातील लोकांना काही प्रमाणात पाणी मिळत होते. पण लोकसंख्या वाढल्याने पाण्याचा प्रश्न अधिकच जटील झाला. मागील १४ वर्षांपासून या परिसरात मीरा-भाईंदर महापालिकेचे पाणी आलेच नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पण त्यासाठीही पैसे मोजावे लागतात. प्रत्येक पिंपासाठी त्यांना ३० ते ५० रुपये मोजावे लागतात. या गावात प्रवेश करताच घराबाहेर मोठे पाण्याचे पिंप दिसतात. प्रत्येक घराबाहेर असलेल्या पिंपाला कुलूप लावलेले आढळते. महापालिकेचा टँकर येताच पाणी भरण्याची धावपळ नागरिकांत स्पर्धा सुरू होते. त्यानंतर पाणी पिंपात भरल्यावर मौल्यवान पाणी कोणी चोरून नेईल या भीतीने कुलूप लावले जाते.

याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा राहाणाऱ्या घरांच्या दुतर्फा लांबच्या लांब पिंपाच्या रांगा पाहायला मिळतात. बैठय़ा चाळी आणि घरातील क्षेत्रफळ कमी असल्याने अडचण निर्माण होत असल्याने घराच्या समोर हे पिंप ठेवले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. पाण्याची भीषण टंचाई असल्याने पाणी चोरीला जाऊ  नये, पाण्यामध्ये कुणी काही टाकू नये यासाठी कुलूप लावून पाणी साठवले जाते.  येथील नागरिक स्थानिक मतदार आहेत, त्यांच्याकडे रेशनकार्ड, घरपट्टी, वीजदेयक, मतदार ओळखपत्र असून महापालिकेचा करही भरत आहेत. पण केवळ निवणुकीच्या तोंडावर आश्वासन दिले जाते.

गेल्या १४ वर्षांपासून आम्ही पाणी मागत आहोत. पण आम्हाला पाणी मिळाले नाही यामुळे टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. जास्त किमतीत पाणी विकत घ्यावे लागत आहे. छोटे ड्रम, पिंप यात पाणी साठवावे लागते आणि कडी, कुलूप लावावे लागते.

– पूनम निषाद, रहिवासी, मांडवी गाव

 तीन दिवसांतून एकदा महापालिकेचे पाणी येते. तेही सर्वाना कमी प्रमाणात मिळते. पिण्यासाठी आणि वापरासाठी एकच पाणी आहे तेही अपुऱ्या प्रमाणात. पाणी खूप जपून वापरावे लागते, कधी कधी तर पालिकेचा टँकर नाही आला तर सहा-सात किलोमीटरवरून पाणी आणावे लागते.

– जनाबाई चव्हाण, रहिवासी

या परिसरातील आदिवासी पाडय़ात पालिकेने नळजोडणी दिली आहे. आता काही वर्षांत नव्याने वस्ती झाली आहे. जिथे जलवाहिन्या टाकणे शक्य नाही, तिथे ५०० रुपये दराने टँकरने पाणीपुरवठा केला जातो. भविष्यात या विभागाचे सर्वेक्षण करून पाणीपुरवठा केला जाईल.

-सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, मीरा-भाईंदर महानगरपालिका

प्रत्येक वेळी निवडणुका आल्यावर आम्हाला पाणी मिळणार असल्याचे आश्वासन राजकीय पुढारी देतात. पण निवडणुका झाल्यावर आम्हाला कोण विचारायलाही येत नाही, गावात पाणी नाही, रस्ते नाही, वीज नाही, शौचालय नाहीत पण आम्ही गरीब असल्याने आमच्याकडे कोणी लक्ष देत नाहीत.

– रामायण यादव, रहिवासी