धुकटन, मासवन केंद्रांत विविध अडचणी

लोकसत्ता वार्ताहर

वसई : वसई-विरार महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळा सुरू होताच विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण होऊ  लागल्या आहेत. या तांत्रिक अडचणीमुळे त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठय़ावर होऊ  लागला आहे.

वसई-विरार महापालिकेला धुकटन व मासवन येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु मागील दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा करणाऱ्या मासवन व धुकटन येथील जलशुद्धीकरण केंद्रात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामध्ये पंपिंग स्टेशनमध्ये कधी गाळ अडकून बसत आहे, तर कधी विजेच्या समस्या यांमुळे शहरातील विविध ठिकाणच्या भागात अनियमित पाणीपुरवठा होऊ  लागला आहे.

मासवन केंद्रातील पंपिंग स्टेशन मधील तीन पंप आहेत त्यातील एक पंप बंद पडला आहे.त्यामुळे केवळ दोनच पंप सुरू असल्याने  काशीद कोपर येथील जलकुंभाच्या टाकीत पुरेसा पाणी उपलब्ध होत नाही. त्यातच कधी कधी महावितरणची लाईन ट्रिप होत असते यामुळे अधिक अडचणी वाढू लागल्या आहेत.

अनेकदा वीजपुरवठा बंद होतो. जेव्हा वीज येते, तेव्हा पंप मोठय़ा क्षमतेचे असल्याने तात्काळ सुरू करता येत नाहीत. त्यामुळे संपूर्ण पाणी वितरणाची व्यवस्था कोलमडत असल्याचे पालिकेने सांगितले.

सध्या केवळ एकाच भागात पाण्याची अडचण नसून इतर विविध ठिकाणच्या भागातही ही समस्या आहे. याचे निवारण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जेव्हा नवीन पंप येईल, तेव्हा पाणीपुरवठा सुरळीतपणे होईल असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

वसई पाश्चिमेतील काही ठिकाणच्या भागात पाणी येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. परंतु जलशुद्धीकरण केंद्रातच तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने पाणीपुरवठा करता येत नाही. त्याच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. लवकरच शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होईल.

केतन राऊत, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग.