05 August 2020

News Flash

घोडबंदरचा पाणीपुरवठा १० दिवसांत सुरळीत

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आश्वासन

प्रातिनिधीक छायाचित्र

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आश्वासन

ठाणे : घोडबंदर भागातील पाणीपुरवठा येत्या १० दिवसांत सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

घोडबंदर भागातील अनेक गृहसंकुलामधील रहिवाशांना आजही पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या भागातील पाणी दुसऱ्या परिसरात वळविल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेतली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले.

नवे ठाणे म्हणून घोडबंदर परिसर ओळखला जातो. या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांत मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. मात्र, या गृहसंकुलांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

येथील कोलशेत, लोढा अमारा, ब्रम्हांड, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या समस्येमुळे येथील रहिवाशी हैराण झाले आहेत.  या भागात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहीन्यांवरून दुसऱ्या ठिकाणी पाणी वळविण्यात आल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. झालेल्या बैठकीमध्ये रहिवाशांनी पाणी टंचाईच्या समस्येचा पाढा वाचला आणि ही समस्या तातडीने सोडविण्याचा आग्रह धरला.

अखेर या सर्वच भागांचा पाणी पुरवठा येत्या दहा दिवसात सुरळीत केला जाईल, असे आश्वासन कार्यकारी अभियंता एम. एस. कलकुटकी  यांनी दिले. तर दहा दिवसात समस्या सुटली नाहीतर ग्रामस्थ आंदोलन करतील, असा इशारा आमदार केळकर यांनी यावेळेस दिला.

नगरसेवक मनोहर डुम्बरे, सुनेश जोशी, ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विकास ढोले, अतुल कुलकर्णी, संजय शेटे यांच्यासह गृहसंकुलातील नागरीक व कोलशेत गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:04 am

Web Title: water supply in ghodbunder road smooth within 10 days zws 70
Next Stories
1 ‘इंद्रधनू रंगोत्सव’मध्ये डॉ. लागूंना आदरांजली
2 पालिकेकडूनच अतिक्रमण
3 जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी लहान आकाराचे सिलिंडर
Just Now!
X