20 November 2019

News Flash

नद्यांचे तप्त डोह पावसाच्या प्रतीक्षेत

नदीच्या पाण्यावर आपली तहान भागवणारी गाई-गुरे हिरव्या चाऱ्यासाठी आता नदी पात्रात घुटमळायला लागली आहेत.

काळू नदीच्या काठावरील पाणी योजना बंद पडण्याची भीती

कल्याण : मागील तीन महिन्यांपासून कडक उन्हामुळे तप्त झालेले नदी पात्रातील उघडे डोह आता पावसाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नदीच्या पाण्यावर आपली तहान भागवणारी गाई-गुरे हिरव्या चाऱ्यासाठी आता नदी पात्रात घुटमळायला लागली आहेत. आता वेळेत पाऊस सुरू झाला नाहीतर कल्याण तालुक्यातील काळू नदीच्या पात्रावर असलेल्या १२ गावांच्या पाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

गेल्या वर्षी पावसाने सप्टेंबर महिन्यातच आपला मुक्काम हलवला. पाऊस ऑक्टोबर अखेपर्यंत कोसळला की नद्यांना डिसेंबर-जानेवारी महिन्यापर्यंत मुबलक पाणी असायचे. या वेळी पावसाने वेळेच्या अगोदरच विश्रांती घेतल्याने नदीपात्रातील पाण्यांवर त्याचा परिणाम झाला. पाऊस ऑक्टोबपर्यंत बरसला की नदी, डोंगरातील झरे, ओहोळांचे प्रवाह पुढील दोन ते तीन महिने संथगतीने नदीपात्राकडे वाहत येतात. नद्यांचे प्रवाह खळखळत सुरू राहतात. यंदा नदी पात्र नोव्हेंबर, डिसेंबरमध्येच कोरडीठाक पडले आहे. मार्च महिन्यानंतर सुरू झालेल्या उन्हाळ्यामुळे नदीपात्रातील पाण्याचे बाष्पीभवन वाढल्याने नद्यांच्या डोहांमधील पाणी आटले आहे. आजूबाजूच्या गावांलगतच्या गाई-गुरांची पाण्यासाठी परवड सुरू झाली आहे. भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतक ऱ्यांची पंचाईत झाली आहे.

काळू नदी आटली

कल्याण तालुक्यातील काळू नदीच्या काठावर गुरवली, म्हस्कळ, मढ, रुंदे, आरेली, फळेगाव अशा १२ गावांच्या पाणी योजना आहेत. मागील तीन महिने नदीपात्रातील खोल डोहांमुळे गावांना तुटपुंजे पाणी मिळाले आहे. या डोहांमुळे गावांवर पाणीसंकट ओढावले नाही, असे कृष्णा टेंभे यांनी सांगितले. काळू नदीतून कल्याण-डोंबिवली पालिका, टिटवाळा शहराला पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणीसाठा कमी झाल्याने नदीतील पाणी उचल बंद करण्यात आली आहे. गावांतील विहिरी, कूपनलिकांना पाणी बंद झाले आहे. पाऊस वेळीच सुरू झाला नाही तर आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हाल सुरू होतील, अशी भीती म्हस्कळ गावचे शेतकरी प्रकाश भोईर यांनी व्यक्त केली.

First Published on June 26, 2019 2:55 am

Web Title: water supply scheme suffer for 12 villages at banks of kalu river in kalyan taluka zws 70
Just Now!
X