मीरा-भाईंदरमध्ये शनिवार, रविवारी पुरवठा पूर्णपणे बंद
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्टेम प्राधिकरणाकडून लागू असलेल्या पाणी कपातीमधून मीरा-भाईंदरला वगळण्याचे आदेश दिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच लघु पाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्य़ाच्या पाणी पुरवठय़ाबाबत आखलेल्या नव्या धोरणामुळे शहरावर पुन्हा एकदा स्टेमकडून पाणी कपात लादली जाणार आहे. दर आठवडय़ातील शनिवार व रविवार असे दोन दिवस स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बंद रहाणार असून आगामी १५ जुलैपर्यंत नागरिकांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
मीरा-भाईंदरला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) ५० दशलक्ष असे एकूण १३६ दशलक्ष लिटर पाणी दररोज मिळते. शहराला आवश्यकतेपेक्षा जवळपास ४० दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने ठाणे जिल्ह्य़ात ३० टक्के पाणी कपात लागू झाली. कपातीनंतर स्टेम व एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा प्रत्येक आठवडय़ाला ४८ तास बंद होऊ लागला. ठाणे जिल्ह्य़ातल्या इतर शहरांच्या तुलनेत मीरा-भाईंदरमधली पाण्याची परिस्थिती फारच बिकट बनल्याने मीरा-भाईंदरला पाणी कपातीमधून वगळावे अशी जोरदार मागणी होऊ लागली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्टेम प्राधिकरणाकडून लागू असलेल्या कपातीमधून मीरा-भाईंदरला वगळण्याचे आदेश दिले. याचा नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. परंतु या दिलाशाचे सुख काही दिवस टिकते न टिकते तोच लघु पाटबंधारे विभागाने जिल्ह्य़ाच्या पाणीपुरवठय़ाचे नवे धोरण नुकतेच जाहीर केले आहे. पाणी कपातीदरम्यान जिल्ह्य़ात वेगवेगळ्या दिवशी पाणी बंद ठेवण्यात येत असल्याने धरणातील पाण्याची नियमित पाणी उचल होऊन उल्हास नदीतील शिल्लक पाणी वाया जात असल्याचे निरीक्षण लघु पाटबंधारे विभागाने नोंदवले आहे. हे पाणी वाचविण्यासाठी यापुढे बारवी धरणावरील जांभूळपाडा येथील पम्पिंग स्टेशन शुक्रवारी रात्री १२ ते रविवारी रात्री १२ असे ४८ तास बंद ठेवण्याचा निर्णय लघु पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यामुळे शनिवार व रविवार दोन दिवस उल्हास नदीत पाणीच सोडले जाणार नाही. लघु पाटबंधारे विभागाच्या या नव्या धोरणानुसार उल्हास नदीतच दोन दिवस पाणी राहणार नसल्याने व आंध्र धरणातून उल्हास नदीत येणारे पाणी उचल करण्यास पुरेसे नसल्याने मीरा-भाईंदरलाही स्टेमकडून दोन दिवस पाणी मिळणार नाही व शहराला पुनश्च ४८ तासांची पाणी कपात लागू होणार आहे.