डोंबिवली पूर्व भागातील पी अ‍ॅन्ड टी कॉलनी भागात गेल्या दीड वर्षांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने या भागातील रहिवासी टँकरने पाणी आणून तहान भागवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याने या भागातील अनेक सोसायटय़ा गेल्या दीड वर्षांपासून टँकरने पाणी विकत घेत आहेत.
या पाणीटंचाईला कंटाळलेल्या पी अ‍ॅन्ड कॉलनी परिसरात राहाणाऱ्या रहिवाशांनी महापालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याची तक्रारी रहिवाशांनी केली आहे. पी अ‍ॅन्ड टी कॉलनी परिसर नांदिवली पंचानंद ग्रामपंचायत हद्दीच्या भागात येतो. या भागात अनेक बेकायदा इमारती, चाळी उभारण्यात आल्या आहेत. या बांधकामांना एमआयडीसीकडून आलेल्या जलवाहिन्यांमधील पाणी वापरले जाते. जलवाहिन्यांना मिळेल त्या पद्धतीने छिद्र पाडून मनमानेल तशा नळ जोडण्या भूमाफिया, रहिवाशांकडून घेण्यात येत आहेत. त्याचा परिणाम पाणी पुरवठय़ावर होत आहे. शिवाय बेकायदा नळ जोडण्या घेणाऱ्या भूमाफियांवर महापालिका, एमआयडीसीचे अधिकारी कारवाई करीत नाहीत, असे रहिवाशांनी सांगितले.