03 June 2020

News Flash

जूचंद्रला पाणीटंचाईच्या झळा?

पाझर तलावाच्या जलकुभांमध्ये दोन महिन्यांपासून गळती

पाझर तलावाच्या जलकुभांमध्ये दोन महिन्यांपासून गळती

कल्पेश भोईर , लोकसत्ता

वसई : नायगाव पूर्वेतील जूचंद्र परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाझर तलावाच्या जलकुंभांना मागील दोन महिन्यांपासून गळती लागली असून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पाझर तलावातील पाणी कमी होऊन नागरिकांना लवकरच मोठय़ा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

नायगाव पूर्वेतील भागाचा झपाटय़ाने  विकास होऊ  लागल्याने या परिसराची लोकसंख्या वाढली आहे. पूर्वेकडील ६९ गावांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे विशेष पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ही योजना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे नेहमी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गावातील पाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पाझर तलाव आहे. नायगाव पूर्वेतील जूचंद्र  वाकीपाडा, चंद्रपाडा या भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांनी पाझर तलाव तयार केले आहे. मागील अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना याच पाझर तलावातून पाणीपुरवठा होत आहे. जूचंद्र गावाला पालिकेतर्फे या तलावातून पाणी पुरविले जाते तर चंद्रपाडा, वाकीपाडा येथे ग्रामपंचायतीकडून पाणी पुरविले जात आहे  सध्या हे तलाव जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. परंतु तेथील पाणी पुरत नाही. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू होत नसल्याने ग्रामस्थांनी पाझर तलावाचा विकास करण्याचे ठरवले. यासाठी २०१६मध्ये गावातील ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन तलावातील गाळ काढणे, त्याची खोली वाढवणे, अशी कामे पूर्ण करून यातील पाणीसाठा वाढवला होता. यामुळे ग्रामस्थांना जेमतेम का होईना, पण पाणी मिळत होते. परंतु आता या तलावाच्या जलकुंभांना मागील दोन महिन्यांपासून गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

चंद्रपाडा आणि वाकीपाडा ही गावे संपूर्णपणे पाझर तलावावर अवलंबून आहेत. जूचंद्र गावालाही ०.५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा या तलावातून होत असतो. जलकुंभांना लागलेल्या गळतीमुळे हळूहळू तलावातील पाणीसाठा कमी कमी होऊ  लागला आहे जर हा प्रकार अशाच प्रकारे सुरू राहिला तर पाझर तलाव अवघ्या काही दिवसांतच आटून भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी यातून वाया जाणारे पाणी थांबवून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. या तलावाच्या ठिकाणी देखरेखीसाठी पालिकेचे कर्मचारी आहेत. त्यांनीही पाणी गळतीची माहिती वरिष्ठांना कळवली आहे. मात्र अद्याप ही दुरूस्ती करण्यात आली नाही.

पाझर तलावाच्या ठिकाणी लागल्या गळतीच्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करण्यात यावी, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पाणीप्रश्न हा गंभीर असल्याने पाणीगळतीच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात येतील

– माधव जवादे, शहरअभियंता, महापालिका

जलकुंभाला गळती लागली आहे आािण पाणी वाया जात आहे. त्याठिकाणी देखरेख करण्यासाठी असलेल्या कर्मचाऱ्यांना यांना सांगून त्यातील पाणी वाया जाणार नाही याकडे लक्ष दिले जाईल आणि त्यानुसार त्याठिकाणी उपाययोजना केल्या जातील.

– केतन राऊत, अभियंता (पाणीपुरवठा), प्रभाग ‘जी’

जूचंद्र गावातील पाझर तलावच्या जलशुद्धीकरण केंद्रातून थेट पाणी सोडले जातो. परंतु पाणी गळती होत असल्याचा प्रकार गंभीर असून याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सूचना करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले जाईल.

– कन्हैया भोईर, सभापती प्रभाग समिती ‘जी’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 2:29 am

Web Title: water tank of pazar lake at naigaon leak from last two months zws 70
Next Stories
1 बेपत्ता तलावाच्या शोधासाठी शासकीय यंत्रणा कामाला
2 गुड न्यूज: पत्री पुलाचे गर्डर अखेर कल्याणमध्ये दाखल
3 पालघर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व
Just Now!
X