पाणीपुरवठय़ावर पाच वर्षांत ८२१ कोटी रुपयांचा खर्च

वसई-विरार शहर महापालिकेने पाणीपुरवठय़ावर मागील पाच वर्षांत ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रुपये इतका खर्च केला असतानाही वसईचा पाणीप्रश्न सुटण्याऐवजी दिवसागणिक अधिकाधिक बिकट होऊ लागला आहे. शहरात पाणीटंचाईची समस्या तीव्रतेने भेडसावत असून नालासोपारामध्ये रोज २०० खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

वसई-विरारला सध्या सूर्या प्रकल्पातून २३० एमएलडी पाण्याचा पुरवठा होतो. याशिवाय उसगाव धरणातून २० एमएलडी आणि पेल्हार धरणातून १० एमएलडी पाणीपुरवठा होतो. पाणी पुरवठय़ाच्या व्यवस्थेवर वसई-विरार शहर महापालिकेने २०१५-१६ या वर्षांत १४७ कोटी ७ लाख ९९ हजार रुपये, २०१६-१७ मध्ये ९३ कोटी ४८ लाख ४१ हजार रुपये, २०१७-१८ मध्ये ८८ कोटी ४९ लाख ७८ हजार रु., २०१८-१९ मध्ये १७३ कोटी ६ लाख ७५ हजार रु., तर २०१९-२० मध्ये ३१९ कोटी ३९ लाख ६७ हजार रुपये खर्च प्रस्तावित आहे. त्यामुळे आजवर एकूण ८२१ कोटी ५२ लाख ६० हजार रुपये खर्च झाला आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात खर्च करूनही शहरात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. अनेक ठिकाणी महापालिकेने नळ बसवलेले आहेत. मात्र या नळांना गेल्या सात वर्षांपासून पाणी येत नाही, अशी विदारक स्थिती काही ठिकाणी आढळून येते.

महापालिकेने पाणीपुरवठा व्यवस्थेवर कोटय़वधी रुपये खर्च केले आहेत. मात्र तरीही वसई-विरारमधील पाणीपुरवठय़ाची स्थिती हलाखीची आहे. नालासोपारा पूर्वेकडील परिसरात दररोज पाण्याचे दोनशे खासगी टँकर पाणीपुरवठा करताना दिसतात. इतर ठिकाणीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. कोटय़वधी रुपयांचा खर्च होत असतानाही लोकांना पाणी मिळत नाही, असे माहिती अधिकार कार्यकर्ता राजकुमार चोरघे यांनी दिली.

ज्या ठिकाणी वितरणाची व्यवस्था नाही, त्याच ठिकाणी पाण्याचे टँकर जातात. इतर ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत आहे. वितरणाची व्यवस्था नसलेल्या ठिकाणीही काम सुरू आहे. लवकरच तिथले टँकरही बंद होतील.-माधव जवादे, शहर अभियंता, पालिका