येऊर वन परिक्षेत्रातील खाद्याचे नमुनेही संकलित

ठाणे : येऊर वन परिक्षेत्रात दोन आठवडय़ांपूर्वी बिबटय़ाचा मृत्यू झाल्याप्रकरणी परिसरातील खाद्याचे आणि तळ्यांतील पाण्याचे नमुने तपासासाठी संकलित करण्यात आले आहेत. या बिबटय़ाचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचा दावा, वन विभागाकडून करण्यात आला होता. मात्र, प्राणीप्रेमींनी याविषयी संशय व्यक्त केल्यामुळे सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.

येऊर पूर्वेकडील चिखलाचा पाडा परिसरात वन विभागाच्या रक्षकांना गस्तीदरम्यान चार वर्षांच्या मादी बिबटय़ाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह तात्काळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात हलवण्यात आला. शवविच्छेदनात हा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मानेजवळ जखम होऊन त्यातून झालेल्या रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, शिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात अडकून या मादीचा मृत्यू झाल्याचा संशय काही प्राणीप्रेमींकडून व्यक्त करण्यात आला होता. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मात्र, या प्रकरणी प्राणीप्रेमी आक्रमक झाल्याने सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.

बिबटय़ाचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या परिसरात प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून तलावांची सोय करण्यात आली आहे. तिथे बिबटे आणि अन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येतात, असे येऊरमधील गावकऱ्यांनी सांगितले. या पाण्यामुळे किंवा परिसरातील खाद्यपदार्थामुळे बिबटय़ाच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याची शक्यता तपासून पाहण्यासाठी येथील पाण्याचे तसेच जंगलातील इतर खाद्यपदार्थाचे नमुने येऊर वन परिक्षेत्राकडून संकलित करण्यात आले आहेत. इथे पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अशुद्ध पाण्यामुळे प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी नमुने संकलित करून तपासणीसाठी पाठवल्याचे येऊर वन परिक्षेत्राकडून सांगण्यात आले.

ओळख पटवणे कठीण

बिबटय़ाच्या शरीरावर असणाऱ्या काळ्या-पिवळ्या ठिपक्यांच्या आणि पट्टय़ांच्या आधारे त्यांची ओळख पटते. बिबटय़ांची नोंद ठेवणाऱ्या समूहांकडे तसेच अभ्यासकांकडे त्यांची नोंद असते. मात्र दोन आठवडय़ांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या या मादी बिबटय़ाच्या मृतदेहाचे विघटन होऊ लागले होते. मान आणि खांद्याजवळील एक बाजू पूर्णपणे विघटित झाली होती. शरीर आणि चेहऱ्याचा काही भाग विघटनशील अवस्थेत होता, असे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बिबटय़ाची ओळख पटवण्यात अडथळा येत असल्याचे प्राणी अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.

बिबटय़ाचा मृत्यू पूर्णपणे नैसर्गिक कारणामुळेच झाला आहे. तपासणीदरम्यान या भागात एकही शिकारी सापळा आढळला नाही. या भागापासून लोकवस्ती दूर आहे. वनरक्षकांची या भागात सातत्याने गस्त असते. केवळ इतर प्राण्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच येथील खाद्य-पाण्याचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.

 – राजेंद्र पवार, येऊर वन परिक्षेत्र अधिकारी, ठाणे</strong>