भाईंदर : मीरा रोड येथील सेंट झेवियर शाळेजवळ असलेल्या एका खासगी उपाहारगृह चालकाने दुकानाबाहेरील मार्गावर अवैध पद्धतीने पाण्याची जलवाहनी जोडणी केली आहे. मुख्य मार्गावर अशा प्रकारे पाण्याची जोडणी केल्यानंतर प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

मीरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ात २५ दशलक्ष लिटर पाण्याची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न जटिल झाला आहे. यात प्रामुख्याने बेकायदा पद्धतीने जलजोडणी करून पाण्याची चोरी केली जात असल्याने पाण्याची कमतरता निर्माण होत असल्याचे आरोप वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांंकडून करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत मीरा रोड येथील पूनम कॉम्प्लेक्स भागात सेंट झेवियर शाळा आहे. या शाळा परिसरात अण्णा डिलाइट असे खासगी उपाहार गृह आहे. या उपाहारगृह चालकाने ग्राहकांना हात धुण्यासाठी उपाहारगृहाबाहेर हात धुण्यासाठी व्यवस्था केली आहे. परंतु यासाठी जोडलेली जलवाहिनी मुख्य मार्गावरून  जाणाऱ्या जलवाहिनीतून करण्यात आली आहे.

शहरात अनधिकृत बांधकाम आणि पाण्याची चोरी थांबवण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अनेक वेळा धोरण आखण्यात आले आहे. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे अनेक व्यावसायिक त्याचा अतिरेक करत असल्याचे दिसून येते. मीरा रोड येथील अण्णा डिलाईट  या उपाहार गृहचालकाने मुख्य रस्त्यावरील  जलवाहिनी जोडणीसह पदपथावरही अतिक्रमण करण्यात आले आहे. परंतु अशा व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.