यंदा पाऊस कमी झाल्याने ठाण्यासह सर्वच शहरांतील नागरिकांना ३० टक्के पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. ‘पाण्याचा अवाजवी वापर करू नका, पाणी जपून वापरा’ असे संदेश देत महापालिका प्रशासने आपले कर्तव्य बजावल्याचा आव आणत आहेत. एकीकडे पालिकेचा नियमित कर भरणाऱ्या, पाण्याचे पैसे मोजणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असताना, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांमध्ये पाणीचोरी करून वापरणाऱ्यांना मात्र मुबलक पाणी मिळत आहे. कळवा येथील महात्मा फुले नगर येथून जाणाऱ्या जलवाहिनीवरील ही दृश्ये पाहिली तर याची खात्री पटते. खाडीच्या बाजूला भरणी करून उभारण्यात आलेल्या या बेकायदा झोपडय़ांत राहणारे रहिवासी थेट मोठय़ा जलवाहिनीतूनच पाणीउपसा करत आहेत. मुख्य जलवाहिनीचा ‘वॉल’ ढिला करून त्यात पाइप टाकून याठिकाणी दिवसाढवळय़ा पाणीचोरी सुरू आहे. याचठिकाणी जलवाहिनीवरच कपडे धुणे, अंघोळी करणे असे उद्योग सुरू असतात. पालिका कर्मचारी कारवाई केल्याचा दिखावा करत असल्याने या पाणी चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी कोणी वालीच नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.