देवाचीपाडा येथे प्रवासी जेट्टीची उभारणी; गृह विभागाकडून १३ कोटींचा निधी मंजूर; रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

कल्याण-डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी विचारात घेऊन या भागातून लवकरात लवकर जलवाहतूक सुरू करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या परिसरातील खाडीचा उपयोग जलवाहतुकीसाठी करण्यात येणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण आणि कोंडी कमी करण्यासाठी शासनाने डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील खाडीकिनारी प्रवासी जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी गृह विभागाने १२ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर केला आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातून जलवाहतुकीसाठी शासन आग्रही असून त्या दृष्टीने तातडीच्या कार्यवाही सुरू केल्या आहेत, असे एका कार्यक्रमात सांगितले. ठाणे महानगरपालिकेने ठाणे जिल्हा परिसरातील खाडी परिसरातील जलवाहतुकीचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी समंत्रकाची नियुक्ती केली आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी परिसरातील शहराजवळून गेलेल्या महामार्गावरील वाहनांचा भार वाढला आहे. त्यामुळे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत या भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. या पाश्र्वभूमीवर देवीचापाडा येथे राज्य शासनाने तातडीने प्रवासी जेट्टी (पाणतळ) बांधण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ठाणे, पालघर जिल्ह्य़ातील खाडीकिनारी ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर, पालघर, डहाणू, कल्याण-डोंबिवली शहरे आहेत. या शहरांमधील खाडीकिनारी प्रवासी जेट्टी बांधून तेथून इतर शहरांमध्ये जलवाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. ठाणे, पालघर जिल्ह्य़ातील खाडीकिनारी असलेल्या शहरांमध्ये प्रवासी जेट्टी बांधण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून डोंबिवलीत देवीचापाडा येथे जेट्टी बांधण्यात येणार आहे, असे बंदरे विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

प्रवासी जेट्टी बांधल्यानंतर तिथे प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, विश्रांतीगृह, संरक्षक भिंत, प्रवासी मार्गिका, वाहनतळ या सुविधा देणे सोयीस्कर होणार आहे, असे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. देवीचापाडा येथील कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने तातडीने या ठिकाणी जेट्टी बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

खाडीकिनाऱ्याचा विकास

तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी कल्याणमधील रेतीबंदर, डोंबिवलीतील खाडीकिनारा विकासासाठी एक कोटीचा निधी तीन वर्षांपूर्वी दिला आहे. या निधीतून पर्यटनस्थळासाठी आवश्यक असलेली साधने खाडीकिनारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये पक्षी, खाडी निरीक्षण मनोरा, मनोरंजन नगरी, उद्यान आदी सुविधांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत सागरीकिनारा मार्गावर जलवाहतूक सुरू करण्यासाठी शासन प्रभावीपणे विचार करीत आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून डोंबिवलीत देवीचापाडा येथे प्रवासी जेट्टी बांधण्यात येणार आहे. ठाणे, पालघर जिल्ह्य़ातील सात ते आठ शहरे जलवाहतुकीने जोडून रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यात येणार आहे.

– रवींद्र चव्हाण, बंदरे विकास राज्यमंत्री