|| जयेश सामंत/सायली रावराणे

ठाणे महापालिकेकडे सविस्तर सर्वेक्षणाची जबाबदारी

ठाणे शहराच्या अंतर्गत भागात खाडीमार्गे प्रवासी जलवाहतूक करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील असलेल्या ठाणे महापालिकेवर आता संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील जलवाहतुकीच्या आखणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उरण, नवी मुंबई, ठाणे, वसई या शहरांपासून मुंबईदरम्यान प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार असून या सर्व मार्गाचे सर्वेक्षण ठाणे महापालिकेने करावे, अशा सूचना केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने केल्या आहेत. त्यानुसार या कामी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई या शहरांना विस्तीर्ण खाडी आणि समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारपट्टीचा प्रवासी जलवाहतुकीसाठी वापर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. सिडकोने काही वर्षांपूर्वी नवी मुंबईतील वाशी येथून गेट वे ऑफ इंडियादरम्यान जलवाहतुकीचा प्रयोग करून पाहिला. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद पडली. तेव्हापासून मुंबई महानगर क्षेत्रात जलवाहतुकीसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. मध्यंतरी राज्य सरकारने नेरुळपासून गेट वे ऑफ इंडियादरम्यान जलवाहतुक सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू केली होती. ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी बेलापूर ते मुंबई जलवाहतूक प्रकल्पासाठी आग्रह धरला होता. मात्र, या प्रकल्पांचे साधे प्रकल्प अहवालही अद्याप तयार झालेले नाहीत. असे असताना केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने मुंबई महानगर क्षेत्रातील संभाव्य जलवाहतूक प्रकल्पांची चाचपणी करून त्यासंबंधी प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेवर सोपविली आहे.

ठाणे शहरात अंतर्गत जलवाहतुकीसाठी लगबग सुरू असताना महापालिकेने मुंबई महानगर क्षेत्रातील जलवाहतुकीच्या चाचपणीसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. यासाठी तब्बल १३ कोटी ५० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली असून त्याद्वारे प्रकल्प अहवाल तयार केले जातील, अशी माहिती ठाणे महापालिकेचे शहर अभियंता अनिल पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

नेमण्यात येणाऱ्या सल्लागारांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई भागात कोणत्या मार्गावर असे प्रकल्प सुरू करता येऊ शकतात यासंबंधी अहवाल तयार करणे अपेक्षित असून ते पुढे राज्य आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी ठेवले जातील, असे पाटील यांनी स्पष्ट केले. सल्लागार नियुक्तीसाठी येणारा खर्च केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातील वाहतुकीसाठी हालचाली जोरात

ठाणे-वसई-कल्याण या मार्गावर हा प्रकल्प सुरू करण्यासंबंधीचा प्रकल्प अहवाल ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राज्य तसेच केंद्र सरकारला सादर केला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांचा निधी देण्यास केंद्रीय जलवाहतूक विभागाने हिरवा कंदील दाखविला असून यासाठी आवश्यक मंजुऱ्या घेण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ठाणे खाडीमध्ये हा प्रकल्प सुरू करायचा असल्याने नौकानयन मंत्रालय तसेच संरक्षण मंत्रालयाकडूनही या प्रकल्पासाठी मंजुरी लागणार आहे. त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाहणी दौरेही सुरू झाले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच येत्या काही दिवसांत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा काढण्यात येणार आहे.

संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रातील संभाव्य जल वाहतूक प्रकल्पांचे सर्वेक्षण आणि नियोजन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेवर सोपविण्यात आली आहे. हा खरा तर महापालिकेचा बहुमान आहे. सल्लागार कंपनीने पावसाचा काळ सोडला तर आठ महिन्यांत यासंबंधी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून महापालिकेस सादर करणे अपेक्षित आहे.     – अनिल पाटील, शहर अभियंता