ठाणे महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सुरू

ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जलवाहतुकीने जोडण्यासाठी जलवाहतूक प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम ठाणे महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. या खाडीलगतच्या अभयारण्यातील वन्यजीवांवर जलवाहतूक प्रकल्पामुळे काही परिणाम होऊ शकतो का, याचा अभ्यास लवकरच सुरू करण्यात येणार असून त्याचबरोबर वसई ते मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली भागांतील खाडीतून दगड आणि गाळ काढल्यानंतर त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होऊ शकतो का, याचाही सविस्तर अभ्यास केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली शहरांवरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर गेल्या काही वर्षांत भार वाढला असून हा भार कमी करण्यासाठी या शहरांना जोडणाऱ्या खाडीमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबवण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला होता.

पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीमध्ये नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यामध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते.

या जलमार्गासाठी एकूण ६४५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मीरा-भाईंदर कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जेटी बांधणे, रिव्हर इन्फर्मेशन सिस्टम विकसित करणे, तीन वर्षे बोटींची दुरुस्ती, निगा व देखभाल अशी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या ८६ कोटी रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. याच बैठकीमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठी खाडीमध्ये जलवाहतूक प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे त्यांनी ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने आता दुसऱ्या टप्प्यातील जलमार्गाचा सविस्तर अभ्यास सुरू करून त्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत हा अहवाल तयार करण्याचा प्रशासनाचा मानस असला तरी हे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबपर्यंतचा अवधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे, नवी मुंबई, मुंबई मार्गाची तपासणी सुरू

  • ठाणे, वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि कल्याण-डोंबिवली या पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबवला जाणार आहे, तर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या दुसऱ्या टप्प्यात ९० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे.
  • पहिल्या टप्प्यातील जलमार्गाची आठ महिन्यांपूर्वी चाचपणी करण्यात आली होती. खाडीमध्ये बोटी चालवण्यासाठी ओहोटीच्या वेळेतही खाडीमध्ये ६ ते ७ मीटर पाणी शिल्लक असणे आवश्यक आहे. त्यामुळे खाडीमध्ये बोटी उतरवून त्याचीही पाहाणी करण्यात आली होती.
  • याशिवाय, खाडी मार्गात खडक आहे का, याचीही पाहाणी करण्यात आली.
  • कोणत्या भागात दगड आणि मातीचा गाळ काढावा लागेल, याचाही अभ्यास करण्यात आला होता.
  • खाडीच्या तळाशी असलेले खडक, माती आणि गाळ
  • याचेही परीक्षण करण्यात आले होते.
  • त्याचप्रमाणे आता ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या मार्गाची तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.