ठाण्यातील नळजोडण्यांवर जलमापके बसवण्याचा निर्णय; दीड लाख जोडण्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ठाणे महापालिका क्षेत्रातील बेसुमार पाणी वापरास लगाम बसावा तसेच नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याची तयारी सुरू केली आहे. शहरातील दीड लाख नळजोडण्यांवर जलमापके बसवण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष जलमापके बसवण्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचे झपाटय़ाने नागरीकरण झाले असून लोकसंख्या २३ लाखांच्या घरात पोहचली आहे. या लोकसंख्येसाठी महापालिका दररोज ४८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करते. त्यामुळे शहराच्या विविध भागांमध्ये दोन ते सहा तास पाणीपुरवठा होतो. नळजोडण्यांवर जलमापके बसवण्यात आली नसल्यामुळे काही नागरिक पाण्याचा बेसुमार वापर करतात. त्यामुळे काही भागांमध्ये नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने वितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करून नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यास सुरुवात केली आहे. बेसुमार पाणी वापरास लगाम बसावा म्हणून नळजोडण्यांवर जलमापके बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावले उचलली असून जलमापकांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

स्वयंचलित जलमापके

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा शहरांमध्ये सुमारे दीड लाख नळजोडण्या असून या सर्वच नळजोडण्यांवर जलमापके बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका स्वयंचलित जलमापके खरेदी करणार आहे. जलमापके बसवण्याचा ५० टक्के खर्च महापालिका करणार आहे. उर्वरित ५० टक्के खर्च संबंधित ग्राहकांकडून चार हप्त्यांमध्ये वसूल केला जाणार आहे. शहरातील नागरिकांकडून महापालिका पाणी बिलांसाठी ठरावीक रक्कम वसूल करते. मात्र, या ग्राहकांच्या पाणी वापरावर कोणतेही र्निबध नाहीत. त्यामुळे अनेकदा पाण्याची नासाडी होते. मात्र, स्वयंचलित जलमापकांमुळे पाणी वापराप्रमाणे संबंधित ग्राहकांना बिले आकारली जाणार असून त्यामुळे बेसुमार पाणी वापराला लगाम बसण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात

शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसवण्यासाठी महापालिका प्रशासनाने महिनाभरापूर्वी निविदा प्रक्रियेला सुरुवात केली. या निविदेतील तांत्रिक बाबींसंदर्भात अनेक नागरिकांनी आक्षेप घेत तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने निविदेमध्ये काही बदल करून ती पुन्हा काढली. येत्या ८ मेपर्यंत या निविदा मागवण्यात आल्या असून त्यानंतर ती स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी सादर केली जाणार आहे. या सर्व प्रक्रियेसाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता असून त्यानंतर शहरामध्ये प्रत्यक्षात जलमापके बसवण्याचे काम सुरूहोणार आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.