17 November 2019

News Flash

धबधबे बहरले, पर्यटक ओसरले

पर्यटकही नैसर्गिक पर्यटनस्थळांपेक्षा सुरक्षित अशा रिसॉर्टना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

विविध प्रतिनिधींकडून, ठाणे : ठाणे जिल्ह्यात अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. पावसाळा सुरू होताच या पर्यटनस्थळांवर जाऊन मौजमजा करण्याचे बेत आखले जातात. यंदा मात्र, या धबधब्यांवर पर्यटकांची अजिबात गर्दी दिसलेली नाही. एकीकडे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने आणलेले निर्बंध याला जबाबदार असल्याचे सांगितले जात असले तरी, आता पर्यटकही नैसर्गिक पर्यटनस्थळांपेक्षा सुरक्षित अशा रिसॉर्टना प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

माहुली गड परिसर

शहापूर तालुक्यातील माहुली गडावर आणि तेथील धबधब्यांवर पर्यटक सातशे ते आठशे पर्यटक दररोज येतात. जिल्हा प्रशासनाने निंर्बध घातलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये याठिकाणाचाही समावेश आहे. शनिवार रात्रीपासून याठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे येथील नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच गडावर दोन ते तीन ठिकाणी दरड कोसळल्याचे प्रकार घडले. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर रविवार सकाळपासून माहुलीगडावर जाण्यास वनविभागाने प्रवेश बंदी लागू केली होती. त्यामुळे पर्यटकांना गडाच्या पायथ्यापासून पुन्हा माघारी परतावे लागले. हिरमोड झालेल्या या पर्यटकांनी परतीच्या रस्त्यावरील ओढय़ांमध्ये भिजून सहलीचा आनंद लुटला. हे चित्र रस्त्यावर ठिकठिकाणी दिसून आले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी १३ स्थानिक तरुणांची समिती नेमली असून त्याच्या मदतीने गडावर येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी या तरुणांना  मानधन दिले जात असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पर्यटकांना धबधब्यांवर जाण्यास बंदी घातल्याचे वनपाल दिनानाथ वायंगणकर यांनी दिली.

घाटघर

शहापूर जिल्ह्य़ातील डोळखांब या गावापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर घाटघर जलविद्युत प्रकल्प आहे. या मार्गावरच अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबे आहेत. जिल्हा प्रशासनाने निंर्बध घातलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये या भागाचाही समावेश आहे. रविवारी याठिकाणी मोठय़ा संख्येने पर्यटक आले होते. काही पर्यटक उघडय़ावर बसून मद्यपान करताना दिसून आले. मात्र, याठिकाणी पोलिसांची गस्त दिसून आली नाही. तसेच घाटघर विद्युत प्रकल्पाच्या धरणावरील बांधावर अनेक पर्यटक फेरफटका मारत होते. काही तरुणांनी ध्वनीक्षेपक यंत्रणा त्याठिकाणी नेली होती आणि त्यावर गाणी वाजवून ते नाचत होते. याठिकाणी कोणतीच सुरक्षा यंत्रणा दिसून आली नाही.

खडवली नदी

ठाणे जिल्ह्य़ातील खडवली नदीचा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकावरून अनेक प्रवासी शेअर रिक्षाने नदीपर्यंतचा प्रवास करतात.  पावसाळी सहलीसाठी अनेकजण याठिकाणी येतात. जिल्हा प्रशासनाने निंर्बध घातलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये याठिकाणाचाही समावेश आहे. होळी उत्सवापासून ते मे महिनाअखेपर्यंत याठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. त्यानंतर पावसाळ्यात नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावते. त्यामुळे हॉटेलच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, असे स्थानिक रहिवाशाने सांगितले. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कल्याण आणि पडघा पोलिसांकडून खडवली नदी परिसरात दिवसभर गस्त सुरु असते. रात्री अडीच वाजता पोलिस शेवटची गस्त घालतात, असेही स्थानिक रहिवाशांनी सांगितले. रविवारी सुट्टीेच्या दिवशी असेच चित्र पहाव्यास मिळाले. याठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतके पर्यटक आले होते.

कांबा

ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण तालुक्यात कांबा गाव येते. कल्याण-अहमदनगर महामार्गालगतच हे गाव आहे. या गावातून उल्हासनदी वाहते. महामार्गावरील पाचवामैल मंदीर येथून नदीच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता असून तेथून अवघ्या दोन मिनीटावर नदी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निंर्बध घातलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये कांबाचा समावेश आहे. प्रत्यक्षात मात्र हे ठिकाण फारसे प्रसिद्ध नसल्यामुळे याठिकाणी पर्यटकांचा ओढा कमी असतो. रविवारी याठिकाणी एकही पर्यटक दिसून आला नाही. पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून त्याच्या काठावर उभे राहून काही स्थानिक रहिवाशी मासेमारी करताना दिसून आले. पर्यटनस्थळापेक्षा धार्मिक कार्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध असून त्याठिकाणी अनेकजण धार्मिक कार्यासाठी आल्याचे दिसून आले.

First Published on July 9, 2019 7:31 am

Web Title: waterfalls in thane district waterfall overflow in thane district zws 70