सखल भागात पाणी तुंबल्याने पूरसदृश्य परिस्थिती

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात पावसाची हजेरी लागताच सखल भागांत पाणी साचल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. जागोजागी पाणी तुंबले असल्याने गटारे व नाले सफाईच्या कामाचे पितळ उघडे पडले. पहिल्याच पावसात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

मीरा-भाईंदर शहरात सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे नवघर, बीपी रोड, केबिन रोड, मुन्शी कंपाउंड आणि कशी गाव यासारख्या सखल भागांत पाणी साचले. अवघ्या एक तास पडलेल्या पावसाने गुडघ्याएवढे पाणी साचले तर दरवर्षी पाणी साचणे हा महत्त्वाचा विषय असतानादेखील प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर शहरात पाणी साचू नये म्हणून दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येतात. परंतु कामातील हलगर्जी, भ्रष्टाचार आणि अपुऱ्या साधनसामग्रीमुळे अनेक भागांतील नाल्यांतील गाळ बाहेर काढला जात नाही.

लोकसंख्या वाढत असल्यामुळे नाल्यातील टाकाऊ  पाण्यात वाढ  झाली असून त्यापासून निर्माण होणारा गाळदेखील अधिक आहे. परंतु पालिकेमार्फत नाल्यामधील वरचा गाळ काढून नालेसफाई केल्याचे मिरवण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

नालेसफाईचे काम चांगल्या पद्धतीने झाले नाही आहे. याविषयी मी तक्रार करत आलो आहे. या वेळीदेखील पालिकेकडून योग्य उपाययोजना न केल्यास भयंकर परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे.

– रोहित सुवर्णा,  सामाजिक कार्यकर्ता