20 January 2021

News Flash

बाजारपेठांना ‘लग्नसराई’चा साज

डिसेंबरमध्ये लग्नसराईचे १० मुहूर्त; ठाणे, कल्याण, उल्हासनगरातील बाजारांत लगबग

तुळशी विवाहनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली असून बाजारपेठांना लग्नसराईचा साज चढू लागला आहे.

लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : तुळशी विवाहनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली असून बाजारपेठांना लग्नसराईचा साज चढू लागला आहे. विवाह समारंभांसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरांतील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत. साडय़ा, बस्ते, तयार कपडे, दागिने, फर्निचर, सौंदर्याची साधने अशा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.

करोना रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे लग्नसमारंभ साजरा करण्यावरही र्निबध आले होते. सुरुवातीच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत टाळेबंदीचे नियम अधिक कडक असल्यामुळे या काळात आयोजित केलेले विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले होते. अनेकांच्या लग्नाच्या तारखाही निश्चित झाल्या होत्या. मात्र, करोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी लग्न सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यत करोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आला असून टाळेबंदीतही शिथिलता आली आहे. त्यामुळे तुळशी विवाहानंतर पुन्हा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात लग्नाचे दहा मुहूर्त आले आहेत. त्यामुळे करोनाकाळात पुढे ढकलण्यात आलेले लग्न समारंभ आता या तारखांच्या मुहूर्तावर आयोजित करण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. या लग्नसराईसाठी साडय़ांचे बस्ते, तयार कपडे, दागिने, फर्निचर, सौंदर्याची साधने तसेच विविध शोभेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी वधू-वराचे कुटुंबीय दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर शहरांतील बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत.

डिसेंबर महिन्यात लग्नसराईचे दहा मुहूर्त असल्यामुळे विविध प्रकारच्या साडय़ांची मागणी गेल्या काही दिवसांपासून वाढली असल्याची प्रतिक्रिया ठाण्यातील कलामंदिरच्या अल्पेश छाडवा यांनी  दिली. तसेच सध्या पारंपरिक संस्कृती जपणाऱ्या नऊवारी आणि जरीच्या साडय़ांची मागणी वाढल्यामुळे या साडय़ांचे विणकाम करणाऱ्या कलाकारांचेही अर्थार्जन होत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून करोनामुळे ठप्प असलेला साडय़ांचा व्यवसाय दिवाळीनंतर पुन्हा रुळावर आला आहे. सध्या लग्नासाठी लागणाऱ्या साडय़ांच्या खरेदीसाठीही ग्राहक येऊ लागल्याचे ‘शुभकन्या’च्या रमेश बौआ यांनी सांगितले.

साडय़ांची ऑनलाइन खरेदी

करोनाचे संकट असल्यामुळे ग्राहक दुकानाच्या ऑनलाइन वेबसाइटवर साडय़ा पाहत असून ऑनलाइनच साडय़ांची निवड करत आहेत. त्यामुळे दुकानामध्ये खरेदीसाठी खूपच कमी वेळ लागत असून गेल्या काही दिवसांत ग्राहक वाढल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून नऊवारी तयार साडय़ांच्या खरेदीकडेही कल वाढला आहे. काही छोटे व्यावसायिक अशा साडय़ांचे शिवणकाम करतात. करोनामुळे हा व्यवसायसुद्धा आठ महिने ठप्प झाला होता. मात्र गेल्या पंधरवडय़ापासून वधूंसाठी तयार साडय़ा शिवण्याची मागणी वाढू लागल्याचे ठाण्यातील ‘ट्रॅडिशनल’च्या ज्योती कुळकर्णी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 2:21 am

Web Title: wedding season reflected in market dd70
Next Stories
1 दोन महिन्यांत १०० कोटींची भर
2 महिला प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ
3 सातबारामध्ये फेरफार करणारे २ तलाठी निलंबित
Just Now!
X