News Flash

ठाणे जिल्ह्य़ात लवकरच ५० ठिकाणी आठवडी बाजार

शेतकरीच शेतमालाचे भाव ठरविणार

जिल्हा प्रशासनाचा निर्णय; शेतकरीच शेतमालाचे भाव ठरविणार

ताजा शेतमाल थेट ग्राहकांना मिळवून देणाऱ्या आठवडी बाजार पद्धतीला ठाणे शहरात मिळत असलेला चांगला प्रतिसाद लक्षात घेता जिल्ह्य़ात ठिकठिकाणी लवकरच ५० आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या बाजारांमध्ये शेतमालाचे भाव शेतकरीच ठरविणार असून, ग्राहकांना ताजा भाजीपाला आणि फळे रास्त भावात मिळत आहेत.

ठाणे शहरात आतापर्यंत गावदेवी मैदान, हिरानंदानी सोसायटी, ब्रह्मांड सोसायटी आणि साकेत या चार ठिकाणी आठवडी बाजार भरू लागले असून, त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोपरी येथील संत तुकाराम महाराज क्रीडांगणात शहरातील पाचव्या आठवडी बाजाराचे उद्घाटन रविवारी सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर संजय मोरे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदी यावेळी उपस्थित होते. या बाजारात भाजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. त्यात महिलांचे प्रमाण मोठे होते. अहमदनगर, नाशिकबरोबरच पालघरमधील डहाणू तसेच मुरबाड येथील शेतकरी त्यांची भाजी आणि फळे या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. या उपक्रमाला मिळणारा ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन लवकरच ठाणे शहरात इतरत्र तसेच जिल्ह्य़ातील डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी शहरांमध्येही येत्या दोन महिन्यांत ५० आठवडी बाजार सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पणन तसेच जिल्हा पुरवठा विभागाला केल्या आहेत.

साडेपाच टन मालाची विक्री

कोपरीतील पहिल्याच आठवडे बाजारात साडेचार टन भाजी आणि एक टन फळांची विक्री झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2016 2:06 am

Web Title: weekly market at thane
Next Stories
1 पोलिसांवर कारवाईची कुटुंबीयांची मागणी
2 वाहतूक पोलिसांवरील हल्ले सुरूच
3 कोंडाणे गैरव्यवहारप्रकरणी सातजणांविरुद्ध गुन्हे
Just Now!
X